आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआशिया चषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर असतील. विराट कोहलीच्या नेतृत्वासाठी हा सामना अग्निपरीक्षेसारखा आहे. कारण दोन्ही टीममधील या सामन्याशी जनभावना जुळलेल्या असतात. मागील काही महिन्यांपासून भारतीय संघाला विदेशी खेळपट्टीवर समाधानकारक कामगिरी करता आली नाही. कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अगोदर दक्षिण आफ्रिकेतील कसोटी आणि वनडे मालिकेत पराभव झाला. त्यापाठोपाठ न्यूझीलंड दौर्यातही टीम इंडियाने पराभवाचा हाच कित्ता गिरवला.
धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाची तुलनात्मक चर्चा केली, तर धोनी हा पराभूत रक्षात्मक कर्णधार आणि विराट कोहली हा टीम इंडियासाठी नव्या तारणहाराच्या रूपात आहे. यात धोनीच्या कार्याची तुलना करण्याचा उद्देश नाही. शुक्रवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय संघातील दुबळ्या बाजू जगजाहीर झाल्या, असे माझे मत आहे. सुमार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे भारताने सामना गमावला. ही दुबळी बाजू रात्रीतून तयार होत नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळतानादेखील संघात या उणिवा होत्या.
जिथपर्यंत विराट कोहलीचा प्रश्न आहे, तो प्रभारी कर्णधाराच्या भूमिकेत आहे. अद्याप तो नेतृत्वासाठी पूर्णपणे मानसिकदृष्ट्या सक्षम झालेला नाही. एका स्पर्धेच्या त्याच्या नेतृत्वगुणाची परीक्षा केली जाऊ शकत नाही. धोनीच्या सुमार कामगिरी करणार्या टीमचे नेतृत्व कोहलीकडे सोपवण्यात आले. त्यामुळे त्याला हे सर्व अवगुण दूर करावे लागतील.
फलंदाजीच्या बाबतीत विराट कोहली एका सक्षम खेळाडूच्या भूमिकेत आहे. त्याने सचिन आणि रिचडर््सचे विक्रम ब्रेक केले आहेत. त्याने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन ओळख निर्माण केली. याशिवाय त्याने 19 वनडे शतकही झळकावले आहेत. शतक झळकावण्याचा जणू त्याला आता छंदच जडला आहे. तसेच तो सध्या आयसीसीच्या वनडे क्रमवारीत दुसर्या आणि कसोटीत आठव्या स्थानावर आहे. हातात बॅट असल्यानंतर विराट कोहली हा संहारक होऊन जातो, हेच त्याच्या खेळीचे वैशिष्ट्य आहे. खासकरून वनडेत त्याला रिचडर््ससारखी रनमशीन म्हणून ओळखले जाऊ लागले. तसेच कसोटी क्रिकेटचा विचार केल्यास, यात त्याची क्षमता ही पहिल्यापेक्षा आता दुप्पट झाली आहे. त्याने कसोटीतही विदेशी खेळपट्टीवर शतक ठोकले आहे. सध्या वर्तमानात निर्विवादपणे विराट कोहलीच टीम इंडियाचा सर्वात्कृष्ट फलंदाज मानला जातो.
काय कारण आहे की, विराट कोहली हा इतरांच्या तुलनेत वेगळा असल्याचे दिसून येते. तो लगेच आत्मसात करणारा आणि धडाकेबाज फलंदाजी करणारा सक्षम खेळाडू आहे. याच कारणामुळे त्याने अल्पावधीत फलंदाजीत नाव कमावले. माझ्या मते, फलंदाजीच्या कौशल्यासह नंबर वन खेळाडू होण्याची महत्त्वाकांक्षा हेच कोहलीमधील उत्कर्षाचे गुण आहेत. सुरुवातीला करिअरमध्ये तो शीघ्रकोपी होता. मात्र, आता त्यात अनेक सकारात्मक बदल घडून आले आहेत. अनुभवातूनच त्याने हे सर्व आत्मसात केले. त्यामुळेच तो परिपक्व होत आहे. आगामी काळात एक यशस्वी कर्णधार म्हणून विराट कोहली नवी ओळख निर्माण करेल, यात काहीही शंका नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.