आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटीतून वनडेत यूटर्न चुकीचा नाही !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेस्ट इंडीज संघ कसोटी मालिकेचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतल्यानंतर बीसीसीआयने श्रीलंकेसोबत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्याचा पर्याय शोधला. श्रीलंकेचा वरिष्ठ क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि अँग्लो मॅथ्यूज यांनी या मालिकेला विरोध केला आहे. आम्ही ऑफसीझन ट्रेनिंग कार्यक्रमात व्यग्र असताना मग अचानक या मालिकेची गरजच काय, असा या दोघांचा सवाल आहे. असो. अखेर संगकाराला दौर्‍यावर यावेच लागले. मात्र, बीसीसीआयचा विचार केला तर त्यांचा निर्णय चकित करणारा होता. बीसीसीआयने वेस्ट इंडीजला तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यास बोलावले होते. ऑस्ट्रेलियात होणार्‍या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा चांगला सराव व्हावा, हा यामागचा हेतू होता.

विंडीजविरुद्ध कसोटी मालिका रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने वनडे मालिकेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आगामी वर्ल्डकप बघता आम्ही या मालिकेचे आयोजन केले आहे, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. वनडे मालिकेमुळे स्पर्धात्मक सरावाची संधी मिळेल. आता बीसीसीआय ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेचा उल्लेख टाळत आहे. माझ्याबाबत विचाराल तर मी बीसीसीआयचे समर्थन करतो. आपले लक्ष वर्ल्डकपवरच असले पाहिजे. कारण आपण विजेता आहोत. अधिकाधिक वनडे खेळल्यामुळे प्रतिभा निवडण्यासाठी निवड समितीची सुविधा होईल. शिवाय मोठ्या स्पर्धेसाठी व्यासपीठ तयार होईल, असे मला वाटते. भारताला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर जानेवारी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसोबत तिरंगी मालिका खेळायची आहे. अशात नवे प्रतिभावान खेळाडू संघाची ताकद वाढवतील. श्रीलंकेविरुद्ध मालिकेचा विचार केला तर निवड समितीला वर्ल्डकपसाठी खेळाडूंना निवडताना सोय होईल. प्रतिभा शोधायची असेल तर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सर्वात मोठे व्यासपीठ आहे, हे मी मान्य करतो. मात्र, आंतरराष्ट्रीय सामन्यांचा जो लाभ होतो, तो नव्या खेळाडूंच्या कामी येतो. आपण वनडे संघ निवडण्याचा प्रयत्न केला तर जवळपास दहा खेळाडूंचे संघातील स्थान निश्चित आहे, असे दिसते.
हे खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, शिखर धवन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे. या सात खेळाडूंशिवाय ऑफस्पिनर आर. अश्विन आणि वेगवान गोलंदाज मोहंमद शमी यांनी मागच्या १२-१८ महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे. यांचे स्थानही पक्के मानता येईल. दहावा खेळाडू म्हणून रोहित शर्माचे स्थान निश्चित झाले आहे. रोहित दुखापतीतून सावरला असून त्याने श्रीलंकेविरुद्ध सराव सामन्यात शतक ठोकले होते. आता उर्वरित पाच स्थानांसाठी संघात चुरस असेल. कर्णधार धोनी श्रीलंकेविरुद्ध पाचपैकी तीन सामन्यांत खेळणार नाही. तो मैदानाबाहेरून नव्या प्रतिभेला शोधू शकतो. दुसरा यष्टिरक्षक म्हणून कोण यशस्वी ठरतो हेसुद्धा पाहिले जाईल. संघात सीनियर खेळाडू युवराजिसंग, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, हरभजन आणि जहीर खान यांना संधी मिळणे कठीण दिसते. त्यांच्या जागी नमन ओझा, मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, कर्ण शर्मा, अक्षर पटेल आणि मनोज तिवारी दावेदार आहेत. हे सर्व खेळाडू आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करीत आहेत.

संघातील स्थापित खेळाडूंना हे आव्हान देत आहेत. खेळाडूंत एक स्वस्थ स्पर्धा तयार झाली आहे. याचा निश्चितपणे टीम इंडियाला फायदा होईल.