आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० म्हणजे लॉटरीच; कधी विजय, तर कधी उलटफेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर यजमान ऑस्ट्रेलियालाच २-० ने हरवून टीम इंडियाने टी-२० मालिकेवर कब्जा केला आहे. धोनी ब्रिगेडने वैयक्तिक आणि सांघिकरीत्याही कांगारूंच्या खेळाडूंपेक्षा सरस कामगिरी केली. खेळ कौशल्यातही भारतीय उत्कृष्टच ठरले.

टी-२० क्रिकेट लॉटरीप्रमाणेच असते, हे सत्य आहे. यात प्रत्येक क्षणाला खूपच उलथापालथ होत असल्याने याची भविष्यवाणी करणे कठीण असते. आयसीसी क्रमवारीच्या बाबतीत टीम इंडिया टी-२० मध्ये आठव्या, तर वेस्ट इंडीजचा संघ पहिल्या स्थानी आहे. भारताने ऑस्ट्रेलियात टी-२० क्रिकेट मालिका जिंकली असली तरी ऑस्ट्रेलिया आगामी टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आपल्या अधिकाधिक खेळाडूंना संधी देत आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. या मालिकेच्या दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात ६ बदल केले होते. तिसऱ्या लढतीतही त्यांच्याकडून अशाच बदलाची शक्यता आहे.

या संपूर्ण मालिकेचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियन संघात ताळमेळाचा अभाव दिसून येतो. त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीचे आक्रमण काहीसे बिथरलेले दिसते. दोन्ही सामन्यांत त्यांची मधली फळी ढेपाळली होती. वेगवान गोलंदाजीतही धार दिसत नाही. भारताच्या विजयाला कमी लेखणे माझा उद्देश नव्हे, परंतु ही वास्तविकता आहे. उस्मान ख्वाजा हा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज बिग बॅश लीगमध्ये दर्जेदार खेळ करून हिरो ठरला होता; परंतु या मालिकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत त्याला खेळवले नाही. आता फक्त तिसऱ्या सामन्यातच त्याला संधी मिळू शकते.
टीम इंडियाबाबत मी इतकेच म्हणेन की, रवी शास्त्री आणि धोनीने संघात सकारात्मक विचारसरणी विकसित केली आहे. संघातील प्रत्येक खेळाडू १०० टक्के योगदानासाठी तत्पर आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कोणत्याही खेळ प्रकारात हरवणे प्रशंसनीय आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दोन सामन्यांत भारत विजयासमीप होता आणि शेवटचा सामना जिंकला. दोन्ही प्रकारांत भारताने आतापर्यंत ३ विजय मिळवले आहेत. धोनी हा संघातला सर्वात प्रभावशाली व्यक्ती आहे. गोलंदाजीतील बदल आणि क्षेत्ररक्षणातील रणनीतीत त्याने चातुर्य दाखवले. झटपट क्रिकेट धोनीला भावते. म्हणूनच त्याने कसोटीतून संन्यास घेतला आहे. त्याने टी-२० चे अधिकाधिक सामने जिंकावे हीच त्याच्या चाहत्यांचीही अपेक्षा असते. कोहली आणि रोहित शर्मानेही या मालिकेत दमदार प्रदर्शन केले. एकदिवसीय मालिकेत दोघांनी दोन शतके ठाेकली. टी-२० च्या दोन्ही सामन्यांत क्रमश: नाबाद ९० आणि नाबाद ५९ धावा काढून विराट सामनावीर ठरला. रोहित सलामीवीराच्या भूमिकेत खूपच यशस्वी ठरतोय.