आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरा, जहीरचे चेंडू.. तीच धार, तोच वार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएल-८ चा अर्धा प्रवास संपला. अनेकखेळाडूंनी शानदार कामगिरी करून नाव कमावले. ३६ वर्षीय वरिष्ठ क्रिकेटपटू आशिष नेहराही त्यापैकीच एक. चेन्नई सुपरकिंग्जच्या या गोलंदाजाने आतापर्यंत १३ बळी घेतले आहेत. कठोर परिश्रम आणि तंदुरुस्तीच्या बळावर यश काबीज होते हे त्याने सिद्ध केले. दुसरा वरिष्ठ आहे जहीर खान. दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळताना पहिल्याच सामन्यात पंजाबचे दोन गडी त्याने बाद केले. नेहरा-जहीर दोघेही डावखुरे, वेगवान गोलंदाज. टीम इंडियात त्यांनी एक काळ गाजवला. नेहरा सदासर्वकाळ उपयोगी सिद्ध होतो आहे. योग्य दिशेने तो चेंडू फेकत आहे. कर्णधार धोनीसाठी नेहरा संकटमोचकच ठरला. गोलंदाजीची सुरुवात तोच करतो. शिवाय हाणामारीच्या षटकांत फलंदाजांना जखडून ठेवतो. जहीरही असाच लाजवाब. दुखापतीमुळे बराच काळ बाहेर राहूनही आयपीएलमध्ये त्याने अविस्मरणीय पुनरागमन केले. शुक्रवारी पंजाबविरुद्ध वेग, स्विंग, दिशेतील त्याची विविधता बघण्यालायक होती. जुने दिवसच डोळ्यासमोरून तरळून गेले.

आयपीएल-८ च्या सुरुवातीपासूनच जुन्या-जाणत्या खेळाडूंकडे लक्ष होते. मात्र ते सारे फलंदाज होते. युवराज सिंग (१६ कोटी), गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि दिनेश कार्तिक कसे खेळतात, याकडे चाहते डोळे लावून बसले होते. तसे पाहिल्यास या चौघांचेही प्रदर्शन फार काही चांगले नाही. मात्र नेहरा आणि जहीरने कमालच केली. निवडकर्ते या कामगिरीमुळे प्रभावित होतात काय, ते पाहावे लागेल. तीनपैकी एका प्रकारात यांचे पुनरागमन होणार काय, याचे उत्तर काळच देईल. माझ्या मते हे कठीण आहे. केवळ षटके गोलंदाजीवरून एकदिवसीय तसेच कसोटीचा अंदाज कसा बांधायचा? तंदुरुस्ती कशी सिद्ध व्हायची? कसोटी तसेच वनडेत प्रचंड तंदुरुस्ती असावी लागते. कसोटीत तर काहीवेळा १८-२० षटके गोलंदाजी करावी लागते, पण प्रश्न फक्त तंदुरुस्तीचाच नाही. टी-२० क्रिकेटमध्ये जरा वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करायची असते. टी-२० तल्या अनेक गोलंदाजांची तुलना कसोटीसाठी करता येत नाही. उदाहरणार्थ डेल स्टेन. कसोटीतला हा अव्वल गोलंदाज आयपीएलमध्ये मात्र कधी संघात तर कधी बाहेर असतो. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या डेव्हिड वॉर्नर आणि रवींद्र जडेजाने कसोटीतही जम बसवला. मात्र गोलंदाजांबाबत असे नाही. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी रणजी सामने फारसे खेळले नाहीत. त्यामुळे दोघांनीही स्थानिक क्रिकेटमध्ये गोलंदाजी करावी. नव्या पिढीला मार्गदर्शन करावे. आयपीएल हे तरुणांसाठी चांगले व्यासपीठ आहे, ज्येष्ठांच्या पुनरागमनाचे नाही. याचा अर्थ आपण जुन्या खेळाडूंचा खेळ पाहायचाच नाही, असा नव्हे. जुनं तेही सोनं.