आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ayaz Memon Expert Comment About Mahendra Singh Dhoni

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धोनीवरच नजरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत महेंद्रसिंग धोनीला दोन बाजूंवर संघर्ष करावा लागेल. एकदिवसीय कर्णधारपद तर राखावे लागेलच, शिवाय एक खेळाडू म्हणूनही उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. याचे कारण म्हणजे अनेकांना विराट कोहली कसोटीनंतर वनडे आणि टी-२० करताही सिद्ध वाटत आहे. त्यालाच कर्णधार करावे असा एक मतप्रवाह आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय तसेच टी-२० मालिका जिंकण्यात फारसे अडथळे येणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.

टीम इंडियाची क्रमवारी आफ्रिकेहून सरस आहे. शिवाय आपण मायदेशात खेळतोय. मात्र, कसोटी मालिकेत नक्कीच आव्हान तगडे असेल. कारण आफ्रिकन गेल्या नऊ वर्षांपासून विदेशात अजेय आहेत. कर्णधार हाशीम आमला, एबी डिव्हिलर्स, डेल स्टेन, मोर्ने मोर्केलसारखे दिग्गज त्यांच्या संघात आहेत. असे असले तरी कसोटीचा मुद्दा विराट कोहलीशी संबंधित आहे. मी तर झटपट सामन्यांविषयी बोलत आहे. एका प्रकारातील कामगिरीचा दुसऱ्या प्रकारांतील सामन्यांवर परिणाम होत नसतो. मात्र, मानसिक बळाचा दुसऱ्या प्रकारांत निश्चित फायदा होतो. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिका जिंकली. मात्र, एकदिवसीयमध्ये २-३ ने पराभव स्वीकारला. कसोटी जिंकल्यामुळे इंग्लंडला बळ आले. याच जोरावर त्यांनी २ सामने जिंकले.
भारताच्या एकदिवसीय संघाचा विचार केल्यास धोनी अनुभवी कर्णधार आहे. समकालीन खेळाडूंमध्ये त्याची समज इतरांहून उजवी आहे. द. आफ्रिकेविरुद्ध चैणाक्ष नेतृत्व करून तो विजयी निशाण फडकवू शकतो. धोनीवर साऱ्यांच्या नजरा असतील. चांगली कामगिरी न केल्यास कर्णधारपद तसेच एकदिवसीय संघातील त्याचे स्थानही डळमळीत होऊ शकते. एकदिवसीय तसेच टी-२० मध्ये धोनी भारताचा सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे, हे निर्विवाद सत्य. दोन्ही प्रकारातील तो मॅचविनर आहे. आगामी काळात भारताला आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच-पाच एकदिवसीय सामन्यांची आणि श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. पुढील वर्षी टी-२० विश्वचषकही होणार आहे. त्यामुळे धोनी आपली उपयुक्तता सिद्ध करतो की विराट कोहली त्याच्यासाठी धोक्याची घंटा वाजवतो, हे येणारा काळच ठरवेल.