आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडीसाठी ‘प्रतिष्ठा’ नव्हे, ‘फॉर्म’ची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकअनुभवी वेगवान गोलंदाज जहीर खानची वेस्ट इंडीजविरुद्ध ‘फेअरवेल कसोटी मालिके’साठी संघात निवड न होणे, हे मला चकित करून गेले. तसे निवड समिती अध्यक्ष संदीप पाटील अँड कंपनी प्रतिष्ठा जपण्याऐवजी सध्या फॉर्म आणि फिटनेसकडे लक्ष देऊन टीमची निवड करत आहे.
ऑफ सीझनमध्ये जहीरने प्रचंड मेहनत घेतली. फिटनेस चांगला करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तो युवराज सिंगसोबत फ्रान्सला गेला होता. गोलंदाजीची लय मिळवण्यासाठी त्याने या ठिकाणी मेहनत घेतली. या ठिकाणाहून आल्यानंतर जहीरचा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत चांगला फॉर्म दिसून आला. अशात वेस्ट इंडीजविरुद्ध जहीरसारख्या दमदार गोलंदाजांची निवड का होऊ नये? माझ्या मते, निवड समितीने 35 वर्षांच्या जहीरच्या जागी युवा गोलंदाजांना संधी देणे योग्य असल्याचे ठरवले असेल. मालिका भारतातच होत आहे. त्यामुळे निवड समिती युवा खेळाडूंना आजमावू पाहत आहे. येत्या काही महिन्यांत टीम इंडिया आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या दौºयावर जाणार आहे. त्यासाठी कदाचित जहीरच्या अनुभवाचा फायदा घेतला जाऊ शकतो. युवा गोलंदाज फ्लॉप ठरल्यानंतरच त्याला संधी मिळू शकते. निवड समितीने वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, गौतम गंभीरसारख्या सीनियर खेळाडूंनादेखील बाहेरचा रस्ता दाखवला. त्यांचे पुनरागमन कठीण होत आहे. हरभजनला तेव्हाच संधी मिळेल, जेव्हा आर.अश्विन अपयशी ठरेल. अन्यथा तो देशांतर्गत क्रिकेटपर्यंतच मर्यादित राहील. राहिला प्रश्न युवराज आणि सुरेश रैनाचा, ते तर वनडे क्रिकेटसाठी संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र, कसोटी टीममधील स्थान ते निश्चित करू शकले नाहीत. रैनाला तर नुकतेच कसोटी टीममधून बाहेर करण्यात आले आहे. रैना आणि युवीची शॉर्ट चेंडूवर खेळण्याची कमकुवत बाजू आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत जगजाहीर झाली आहे. अशात तांत्रिक बाजूचा विचार केल्यास, नुकतेच रोहतक येथे हरियाणाविरुद्ध रणजी सामन्यात सचिनने कठीण परिस्थितीतही धाडसाने आणि सर्वोत्कृष्ट खेळी करून काढलेल्या नाबाद 79 धावा कौतुकास्पद आहेत. तसेच इतर क्रिकेटपटूंसाठी प्रेरणादायी आहेत. सेहवाग आणि गंभीरलाही आपल्या फलंदाजीमध्ये अशी दृढता दाखवावी लागेल. यामधून त्यांचे पुनरागमन होऊ शकेल. जिथे भारतीय कसोटी टीमचा प्रश्न, तर शिखर धवन, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे वर्षभरापासून जबरदस्त फॉर्मात आहेत. शिखर धवन आणि मुरली विजय मागील सत्राप्रमाणेच चांगली जुगलबंदी करू शकतात. मात्र, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरतील की नाही, हे अद्याप सांगणे अतिघाईचे ठरेल. अशात चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीची गॅरंटी घेतली जाऊ शकते. हे दोघेही टीमसाठी ‘खास’ ठरू शकतात. फिटनेस चांगला केल्यावर पुजारा वनडे टीममध्येही सहभागी होऊ शकतो. आता कोहलीच्या निवडीचा प्रश्न, तर त्याची तुलना आता सचिन आणि व्हिव्हियन रिचर्ड्ससोबत केली जात आहे. वनडेत हे सर्व ठीक आहे, मात्र कसोटीत हे ध्येय अद्याप त्याला गाठायचे आहे. तो चांगल्या फॉर्मात आहे. तो कसोटीतही विक्रम करू शकतो. शेवटी, महानता ही त्याच्या मुठीत आहे. तो आत्मविश्वासाने मार्गस्थ होत आहे.