आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी खेळपट्टीवर टीम इंडिया सक्षम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट टीमला दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीवर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे कसोटी मालिकेतील कामगिरीचा प्रश्न? या मालिकेत टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे.
भारतीय टीमने ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघाला 4-0 ने धूळ चारली होती. हा कॉलम लिहीपर्यंत डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेने दुस-या कसोटीत समाधानकारक कामगिरी केली होती. खासकरून डेल स्टेनने तुफानी गोलंदाजी करताना पहिल्या डावात सहा विकेट घेतल्या आहेत. दोन्ही टीममधील पहिली कसोटी रोमांचकपणे खेळवली गेली. स्टेनला पहिल्या कसोटीत समाधानकारक खेळी करता आली नाही. मात्र, त्याने दुस-या कसोटीत ही उणीव भरून काढली. अनिर्णीत राहिलेल्या पहिल्या कसोटीचा सर्वच खेळाडूंना फायदा झाला. आता तिसरी कसोटी अद्याप व्हायची आहे. टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना या मालिकेत बरेच काही शिकण्याची संधी मिळाली आहे. मुरली विजय, विराट कोेहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे विदेशी खेळपट्टीवर धावा काढण्यात सक्षम असल्याचे सिद्ध झाले. मात्र, दुसरीकडे शिखर धवन, रोहित शर्मा आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी अपयशी ठरले आहेत. या त्रिकुटाला आपल्या कामगिरीचा दर्जा सुधारण्याची आवश्यकता आहे. या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेत उसळत्या आणि शॉर्ट चेंडूवर खेळण्याच्या शैलीत बदल करण्याची गरज आहे. पुजारा आणि विराट कोहलीने जोहान्सबर्गमध्ये द्विशतकी भागीदारी केली आणि डर्बनमध्ये पुजारा आणि मुरली विजयने दीडशतकी भागीदारी केली. गोलंदाजीत 35 वर्षीय जहीर खानने सुखद पुनरागमन केले. याशिवाय मोहंमद शमी आणि ईशांत शर्मानेदेखील चांगली भूमिका बजावली. हे तिघेही मॅच विनर गोलंदाज आहेत. त्यांनी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजांनाही जेरीस आणले. फिरकीत प्रज्ञान ओझाला अद्याप संधी मिळाली नाही. मात्र, ऑफस्पिनर आर.आश्विनने सपशेल निराशा केली. त्याला घरच्या मैदानावरही चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या घरच्या आणि विदेशी मैदानावरील कामगिरीत मोठा फरक आहे. त्याला अवघ्या वीस कसोटींचा अनुभव आहे. प्रतिभावंत असलेल्या अश्विनचा नकारात्मक दृष्टिकोन कधीही नसतो. भारतीय संघातील खेळाडंूबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काही टीकाकार हे मागील कामगिरीचा लेखाजोखा पाहून टीकास्त्र सोडत आहेत. मात्र, जोहान्सबर्गमध्येच टीम इंडियाच्या खेळाडूंनी विदेशी खेळपट्टीवरही सक्षम असल्याचे दाखवून दिले.
कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आंतरराष्‍ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट टीमचा दर्जा मिळवला आहे. त्यामुळे टीमचा आत्मविश्वास दुणावला. आता हा दर्जा टिकवून ठेवण्याचे खेळाडूंसमोर आव्हान आहे. नव्या वर्षात सांघिकता टिकवून ठेवण्याची टीम इंडियाकडून आशा आहे.