आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या मालिकेने फायदा होणार नाही !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विदेशी भूमीवर खेळण्यासाठी भारतीय संघाचा दौरा वैयक्तिक प्रदर्शनाचा हिशेब लावला तर सोपा ठरलेला नाही. भारतीय खेळाडू विदेशी भूमीवर वेगवान गोलंदाजांचा सर्मथपणे सामना करू शकत नाहीत. यामुळेच त्यांच्यावर टीका होते. इतकेच नव्हे तर विदेशी दौर्‍याचा कार्यक्रमही योग्यपणे निश्चित होत नसल्याने टीका होत आहे. सध्या छोटेखानी दौर्‍याला प्राधान्य दिले जात आहे. यामुळे खेळाडूंना विदेशी भूमीवर कमाल करण्याची संधी अपेक्षेनुसार कमी मिळते.
टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौर्‍याचेच उदाहरण घ्या. आजपासून पहिला वनडे सुरू होत आहे. टीम इंडियात तब्बल 12 असे खेळाडू आहेत, ज्यांचा हा पहिला न्यूझीलंड दौरा आहे. दौर्‍यात पाच वनडे, एक दोनदिवसीय आणि नंतर दोन कसोटी सामने होतील. दोन कसोटी सामन्यांची मालिका खरोखरच मालिका होऊ शकते काय ? आपले खेळाडू न्यूझीलंडची सहल करण्यासाठी गेले आहेत की काय, असे वाटते. एका काळ असा, ज्या वेळी दौरा लांबच्या लांब असायचा. खेळाडूंनी विदेशी वातावरणाशी एकरूप व्हावे, हे यामागचे कारण असायचे. 1982-83 मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौर्‍यावर गेला होता, त्या वेळी दौरा तब्बल 100 दिवसांचा होता. त्या दौर्‍यात सहा कसोटी, पाच वनडे आणि सहा प्रथम र्शेणीचे सामने झाले. हे सराव सामने कसोटी सामन्यांच्या मध्यात खेळले गेले. आता तर आंतरराष्ट्रीय कॅलेंडरला इतके व्यग्र बनवले आहे की, बहुतेक दौरे संक्षिप्त होऊ लागले. हे काही क्रिकेटच्या हिताचे नाही.
माझ्या मते, असे व्हायला नको. दौरा लांबच असला पाहिजे. वेस्ट इंडीजच्या खेळपट्टीचे चरित्र भारत आणि इंग्लंडच्या खेळपट्टीशी भिन्न आहे. अशात जर टीम इंडियाचा विंडीज दौरा संक्षिप्त होत असेल तर याचा काय फायदा होणार? संघात प्रत्येक जण गावसकर, सचिन, द्रविड, लक्ष्मण तर नाही की कोणत्याही ठिकाणी सर्मथपणे खेळू शकतील. जगातले तीन महान गोलंदाज मुरलीधरन, डेल स्टेन आणि शेन वॉर्न या खेळाडूंची उगीच स्तुती करीत नाहीत.
माझ्या मते, वर्तमानातील खेळाडूंना विदेश दौर्‍यावर स्वत:ला परिस्थितीशी एकरूप होऊन खेळपट्टीनुसार खेळ करता येईल इतका वेळच मिळत नाही. तसेही आपल्या संघाला विदेशी भूमीवर खास कमाल करता आलेली नाही. 2011 च्या वर्ल्डकपनंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील कसोटी व वनडेत आपला लाजिरवाणा पराभव झाला. आतासुद्धा दक्षिण आफ्रिकेत कसोटी व वनडे मालिका गमावून आपण न्यूझीलंडमध्ये दाखल झालो आहोत. तीन मोठय़ा संघांविरुद्ध मागच्या दोन वर्षांत आपल्याला दयनीय पराभवाचा सामना करावा लागला. या वर्षी भारतीय संघाला न्यूझीलंडनंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया जुन्या अपयशाला मागे टाकून नवे यश मिळवेल, अशी आशा आहे. संघात युवा खेळाडूंची भरमार आहे. यामुळे संघ ऊर्जावान आहे. मी पुन्हा म्हणेन की, या खेळाडूंना अधिकाधिक आंतरराष्ट्रीय अनुभव देण्यासाठी सर्व दौर्‍यांचा कालावधी वाढवला पाहिजे. असे झाले तर आपले युवा त्यांच्या कौशल्याची चुणूक दाखवू शकतील.