आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार महेंद्रसिंग धोनी ठरला अपयशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूझीलंड दौ-यातील पराभवाने आता भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दुहेरी टीकेला सामोरे जावे लागत आहे. यात पहिले म्हणजे भारताची आयसीसीच्या क्रमवारीतील अव्वल स्थानावरून झालेली घसरण आणि दुसरे म्हणजे त्याच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
टीम इंडिया विश्वविजेता आहे. मात्र, क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडने या वर्ल्ड चॅम्पियन टीमला वनडे मालिकेत 4-0 ने पराभूत केले. न्यूझीलंडपूर्वी धोनी ब्रिगेडने दक्षिण आफ्रिका दौ-यात कसोटी आणि वनडे मालिका गमावली होती. वनडे मालिकेत पराभव होणे, ही काही आश्चर्याची गोष्ट मानली जात नाही. नुकतेच ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला वनडे मालिकेत 4-1 ने धूळ चारली. तत्पूर्वी बांगलादेश टीमने न्यूझीलंडला पराभूत केले होते.
आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेचा प्रश्न आहे. या मालिकेत यजमानांच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. याउलट आगामी वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाची कोणत्याही प्रकारची तयारी नसल्याचे जगजाहीर झाले. विदेशी खेळपट्टीवर गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षणातील भारताची दुबळी बाजू सहज नजरेस पडत आहे. आता धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची ही दुबळी बाजू अधिकच स्पष्ट झाली.
2011 च्या वर्ल्डकपनंतर नव्या उमेदीने भारतीय संघ विदेश दौ-यात सुमार कामगिरीचा असलेला कलंक पुसण्याचा प्रयत्न करेल, अशी आशा केली जात होती. मात्र, यात वेगळाच फरक पडला. टीम इंडियाने तीन वर्षांत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर मालिका गमावल्या आहेत. या सुमार कामगिरीमुळे आता काय बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी, निवड समिती, प्रशिक्षक आणि टीमचा कर्णधाराच्या बाबतीत नव्याने विचार करण्यात येईल किंवा नवी रणनीती तयार केली जाईल की, टीममध्ये आपल्या आवडत्या खेळाडूला स्थान देण्याची परंपरा कायम राहील. माझ्या मते, टीमच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी त्यांना भाग पाडायला हवे. असे झाले नाही तर आगामी 2015 च्या वर्ल्डकपमधील विजेतेपदाचा विचारदेखील आम्ही करायला नको. तसेच आता भारतीय संघाने आगामी वर्ल्डकपसाठी नव्या चेह-यांच्या शोधासाठी कोणत्याही प्रकाराची ठोस पावले उचलली नाहीत.
कर्णधार धोनीच्या वैयक्तिक कामगिरीचा विचार केल्यास तो एक यशस्वी फलंदाज आहे. न्यूझीलंड दौ-यात त्याने तीन एकदिवसीय सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. दोन सामन्यांत त्याने 40 पेक्षा अधिक धावा काढल्या. कर्णधाराच्या भूमिकेमुळे धोनीवर टीका केली जाऊ शकते. तो टीमला प्रेरित करण्यात आणि नवे डावपेच आखण्यात खरंच कमी पडला आहे. याशिवाय प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूंची निवड करतानाही त्याचे अंदाज साफ चुकले आहेत. यापूर्वी धोनीमधील अशी दुबळी बाजू कधीही दिसली नाही. तो टीमच्या फायद्याचाच नेहमी निर्णय घेत असे. मात्र, आता नाणेफेकीनंतर धोनी फलंदाजी करावी की नाही याचादेखील योग्य निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम आमच्या गोलंदाजांवर पडत आहे. त्यामुळे ते संघाच्या विजयासाठी समाधानकारक कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. न्यूझीलंड दौ-यात पहिल्यांदाच धोनीला अपयशी ठरल्याचे पाहिले जात आहे. सलगच्या पराभवाचा परिणामही त्याच्यावर झाल्याचे लक्षात येते.