आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Badminton Player Kashyap Assures Medal In Glasgow Commonwealth Games

CWG : स्क्वॅशमध्ये दीपिका-जोश्नाला सुवर्ण ! बॉक्सिंगमध्ये तीन रौप्यपदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगो - स्क्वॅशमध्येही अखेर भारतीय तिरंगा झळकला. स्क्वॅशमध्ये महिलांच्या दुहेरीत भारतीय खेळाडू दीपिका पल्लिकल आणि जोश्ना चिनप्पा यांनी सुवर्णपदक जिंकले. या दोघींनी फायनलमध्ये इंग्लंडची जोडी जेनी डुनकाल्फ आणि लॉरा मसारो यांना दोन सेटमध्ये पराभूत केले. दीपिका-जोश्ना यांनी 11-6, 11-8 ने विजय मिळवत सुवर्णपदक भारताच्या नावे केले. स्क्वॅशमध्ये भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. याशिवाय भारताने शनिवारी बॉक्सिंगमध्येही दोन रौप्यपदके जिंकली. भारताचा देवेंद्रो लॅशरामने पुरुषांच्या 49 किलो लाइट फ्लायवेट बॉक्सिंगमध्ये शानदार कामगिरी करून रौप्यपदक जिंकले. देवेंद्रोने स्पर्धेत दमदार प्रदर्शन करून फायनलमध्ये धडक दिली. फायनलमध्ये मात्र त्याचा शनिवारी उत्तर आयर्लंडचा पॅडी बारनेसने पराभव केला. महिला गटातसुद्धा लॅशराम सरितादेवीने दमदार कामगिरी करून 57-60 किलो वजन गटात रौप्यपदक जिंकले. बॉक्सिंगमध्ये देवेंद्रोकडून सुवर्णपदकाची आशा केली जात होती. मात्र, बारनेस त्याला वरचढ ठरला. तिन्ही निर्णायक सेटमध्ये 29-28, 30-27 आणि 29-28 ने बारनेसने बाजी मारली.
दीपिका-जोश्नाचा विजय
स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताला सुवर्णपदकासाठी खूप प्रतीक्षा करावी लागली. बॉक्सिंगच्या दोन फायनलमध्ये सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. यामुळे सर्वांच्या नजरा स्क्वॅशच्या फायनलवर टिकून होत्या. चेन्नईची 22 वर्षीय दीपिका पल्लिकल आणि याच राज्याच्या 27 वर्षीय चिनप्पाने इंग्लिश जोडीविरुद्ध शानदार सुरुवात केली. दोघींनी पहिला गेम 11-6 ने जिंकला. दुसºया गेममध्ये डुनकाल्फ आणि मसारो यांनी जोर लावत 6-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र, भारतीय जोडीने निर्णायक सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले. यानंतर भारताने 7-7 ने बरोबरी केली. पुढे भारतीय खेळाडूंनी सलग गुण मिळवत स्कोअर 10-7 असा केला.
गुरुसाईदत्तला कांस्य
भारताचा बॅडमिंटनपटू गुरुसाईदत्तने दर्जेदार कामगिरीच्या जोरावर कांस्यपदकावर ताबा मिळवला. इंग्लंडचा बॅडमिंटनपटू राजीव ऑसेफचा त्याने 21-15, 14-21, 21-19 ने पराभव केला.

पॉवरलिफ्टिंग : राजविंदरला रौप्य, सकिनाला कांस्य
पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या राजविंदर राहेलूने कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आणि रौप्यपदकाची कमाई केली. त्याने गट ‘अ’च्या हेविवेट गटात 180.5 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. दुसरीकडे महिला गटात कर्नाटकच्या सकिना खातूनने राष्ट्रकुल स्पर्धेत शनिवारी भारतीय संघाला कांस्यपदक मिळवून दिले. या युवा खेळाडूने पॉवरलिफ्टिंग प्रकारात हे यश संपादन केले. सकिनाने महिलांच्या लाइटवेट 61 किलो वजन गटात तिसरे स्थान पटकावले. तिने एकूण 88.2 किलो वजन उचलून कांस्यपदकावर नाव कोरले. या गटात नायजेरियाची इस्टर ओयेमा 136 किलो वजन उचलून सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तसेच इंग्लंडच्या नटालिई ब्लॅकने रौप्यपदक पटकावले.बॉक्सिंग : मनदीपला रौप्य
भारताचा स्टार बॉक्सर मनदीप जागडाने रौप्यपदकाची कमाई केली. त्याला इंग्लंडच्या स्कॉट फिझगेराल्डने 3-0 ने पराभूत केले. अतिआत्मविश्वासामुळे मनदीपला अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागला. तीनही सेटमध्ये भारताच्या मनदीपला इंग्लंडच्या खेळाडूने रिंगमध्ये खाली पाडले. त्याने नवख्या खेळाडूसारखा खेळ केला. स्वत:चा बचाव न केल्याने त्याला गुण गमवावे लागले.

छायाचित्र - पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये भारताच्या राजविंदर राहेलूने कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली