आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Badminton: Young Guns To Lead Indian Challenge In Malaysian

मलेशियन ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहार बहरू - मलेशियन ग्रँडप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. विजयी सलामी देत स्पर्धेत दमदार सुरुवात करण्यासाठी भारताचे युवा खेळाडू सज्ज झाले आहेत. यात सौरभ वर्मा आणि नागपूरची अरुंधती पानतावणे स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेती पी.व्ही. सिंधूने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. कश्यपनेदेखील माघार घेतली.

सौरभ, अरुंधतीकडून आशा
भारताच्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत सौरभ वर्मा, अरुंधती, एचएस प्रणव, साई प्रणीत आणि आरव्हीएम गुरुसाईदत्त या स्पर्धेत नशीब आजमावणार आहेत. यात सौरभ आणि अरुंधतीकडून मोठी आशा आहे. नुकतेच सौरभने टाटा ओपन, ऑस्ट्रिया इंटरनॅशनल चॅलेंज आणि इराण फजर इंटरनॅशनल स्पर्धेचे किताब जिंकले आहेत. त्यामुळे त्याच्याकडून या स्पर्धेत किताबाची आशा आहे. सौरभ वर्माला या स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आठवे मानांकन मिळाले आहे. त्याच्यासमोर सलामी सामन्यात हॉँगकॉँगच्या यान किट चानचे तगडे आव्हान असेल.

प्रणव-जियान चियांग सलामी लढत
गतवर्षीचा टाटा ओपन स्पर्धेतील उपविजेता प्रणवदेखील स्पर्धेत नशीब आजमावणार आहे. त्याला पुरुष एकेरीत सातवे मानांकन मिळाले आहे. त्याचा सलामी सामना यजमान मलेशियाच्या जियान शियांग चियांगशी होईल. त्याने नुकतेच सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये धडक मारली होती.

तन्वीसमोर दिनारचे आव्हान
युवा महिला खेळाडू तन्वी लाड महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्यासमोर पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या दिनार डी आयुस्टाइनचे तगडे आव्हान असेल. तसेच अरुंधती पहिल्या फेरीत जपानच्या आयुमी माइनविरुद्ध लढतीतून विजयी मोहिमेला प्रारंभ करेल.