आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh Vs. India, Asia Cup ODI News In Marathi

आशिया चषक : आज टीम इंडिया-बांगलादेश झुंज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फातुल्लाह - आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि यजमान बांगलादेशचे खेळाडू बुधवारी समोरासमोर असतील. विदेशी भूमीवर सुमार कामगिरीमुळे सध्या टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या टीम इंडियासमोर या स्पर्धेत चांगल्या कामगिरीचे आव्हान असेल. धोनीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करीत असलेला प्रभारी कर्णधार विराट कोहलीने चांगल्या कामगिरीसाठी आशा व्यक्त केली आहे.

भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सर्वाधिक पाच वेळा जिंकली आहे. असे असले तरीही घरच्या मैदानावर खेळताना बांगलादेशची टीम विजयासाठी जोरदार प्रयत्न करेल. मागच्या काही वर्षांत बांगलादेशची कामगिरी चमत्कारिक अशीच राहिली आहे. यामुळे बांगलादेशला कमी लेखले जाऊ शकत नाही.

भारताचा नियमित कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जागी विराट कोहलीला प्रभारी कर्णधार बनवण्यात आले आहे. स्वत:ला एक कर्णधार म्हणून सिद्ध करण्याची विराट कोहलीकडे संधी असली तरीही या स्पर्धेतील आव्हान एखाद्या अग्निपरीक्षेसारखेच आहे. कारण, मागील वर्षभरातील सुमार कामगिरीमुळे टीम इंडियावर टीकेची तोफ डागल्या जात आहे. अशा परिस्थितीत आशिया चषकात समाधानकारक कामगिरी करण्याची भारताकडून आशा आहे. यासाठी युवा खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

यजमानांसमोर आव्हान
दुसरीकडे बांगलादेशसमोरही अडचणी कमी नाहीत. नुकत्याच झालेल्या मालिकेत बांगलादेशला श्रीलंकेने 3-0 असे एकतर्फी पराभूत केले. कर्णधार मुशाफिकूर रहिमसमोर मागचा पराभव विसरून भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध नव्या दमाने सुरुवात करण्याचे आव्हान असेल.

बांगलादेशकडे अब्दुर रज्जाक, नईम इस्लाम, अनामुल हक, शमशूर रेहमानसारखे चांगले खेळाडू आहेत. हे खेळाडू भारतासमोरील अडचणी वाढवू शकतात.

काय असेल आव्हान ?
टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज विदेशी भूमीवर सलगपणे अपयशी ठरत आहेत. सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक आणि विराट कोहलीपुढे मोठा स्कोअर उभा करण्याचे आव्हान असेल. चेतेश्वर पुजारा आणि अंबाती रायडू यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. त्यांच्याकडे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असेल. स्टुअर्ट बिन्नी आणि रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली भूमिका पार पाडतील. अंतिम अकरा खेळाडूंत कोणाकोणाला संधी मिळेल, हे पाहणे रोमांचक ठरेल.

दोन्ही संभाव्य संघ
भारत
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, दिनेश कार्तिक, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, वरुण अ‍ॅरोन, आर. अश्विन, ईश्वर पांडे.

बांगलादेश
मुशाफिकूर रहिम (कर्णधार), अब्दुर रज्जाक, अल अमीन हुसेन, अनामुल हक, अराफत सनी, इमरुल कायस, एम.हक, एम. मुर्तुजा, नईम इस्लाम, नासिर हुसेन, रुबैल हुसेन, एस. रेहमान, शकिबल-अल-हसन, सोहाग गाजी, जियाऊर रेहमान.

गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची
फलंदाजांप्रमाणे बांगलादेशात गोलंदाजांची भूमिकाही महत्त्वाची असेल. न्यूझीलंडमध्ये नुकत्याच झालेल्या मालिकेत मोहंमद शमी, रविचंद्रन अश्विन, अष्टपैलू जडेजा आणि वरुण अ‍ॅरोन यांची कामगिरी चांगली झाली होती. याशिवाय वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेलाही संधी मिळू शकते. सराव सामन्यात त्याने चार विकेट घेऊन स्वत:ला सिद्ध केले.