बार्सिलोनाची गेटाफीवर 4-0 / बार्सिलोनाची गेटाफीवर 4-0 ने मात

वृत्तसंस्था

Apr 12,2012 05:19:24 AM IST

माद्रिद- गतविजेत्या बार्सिलोनाने थरारक खेळ करून गेटाफीवर दणदणीत 4-0 ने विजय मिळवला. या विजयानंतर बार्सिलोनाने रिअल माद्रिदवर दबाव निर्माण करण्यात यश मिळवले.
बार्सिलोनाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करताना लीगमध्ये सलग दहावा विजय मिळवला. बार्सिलोनाकडून अँलेक्स सांचेझने दोन गोल केले. पेड्रो रॉड्रिग्ज आणि लिओनेल मेसी यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाला 4-0 असा सरळ विजय मिळवून दिला. आता मेसीच्या नावे लीगमध्ये 39 आणि सत्रात एकूण 61 गोल झाले आहेत.
बार्सिलोनाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून गेटाफीची सुरक्षा फळी भेदून काढली. बार्सिलोनाच्या आक्रमक खेळामुळे गेटाफीच्या खेळाडूंनी रक्षात्मक भूमिका स्वीकारली. आता येत्या बुधवारी रिअल माद्रिदचा सामना अँलटिको माद्रिदसोबत होणार आहे. 1999 पासून रिअल माद्रिदने अँलटिको माद्रिदविरुद्ध सलग विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवून चार गुणांची आघाडी घेण्याच्या प्रयत्नात रिअल माद्रिदचे खेळाडू असतील.
चॅम्पियन्स लीगमध्ये येत्या 21 एप्रिल रोजी बार्सिलोना वि. रिअल माद्रिद लढत रंगणार आहे. दोन दिग्गज या लढतीच्या निमित्ताने आमने-सामने असल्याने जगभरातील चाहत्यांचे लक्ष या सामन्यावर आहे. या सामन्याच्या निमित्ताने बार्सिलोनाचा गेटाफीवरील विजय माद्रिदवर दबाव निर्माण करणारा असल्याचे बोलले जाते.
या लढतीतही मेसीचा थरार रंगला. मात्र, मेसी केवळ एकच गोल करू शकला. चेंडू मेसीजवळ जाताच स्टेडियममधील तमाम चाहत्यांचा त्याला पाठिंबा मिळायचा. बार्सिलोनाने उत्तम पासिंग आणि योग्य ताळमेळच्या बळावर सामना एकतर्फी ठरवला.


X
COMMENT