आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना रोखण्यासाठी बीसीसीआय सरसावली, राजस्थान स्पोर्ट् अ‍ॅक्टला देणार आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राजस्थानातील क्रिकेटचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी बीसीसीआयने वेळीच पावले उचलावीत आणि आजीवन बंदी घालण्यात आलेल्या ललित मोदी यांचा भारतीय क्रिकेटमधील प्रवेश कसा रोखावा यासाठी कार्यकारिणी समितीची शनिवारी चेन्नई येथे बैठक झाली. ललित मोदी यांना बडतर्फ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता बीसीसीआयने कृती करावी तसेच बडतर्फ करण्यात आलेल्या ललित मोदी यांना राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत सहभागी करून घेणा-या राजस्थान क्रिकेट असोसिएशनवर यापुढे कोणती कारवाई करावी याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. राजस्थान स्पोर्ट् अ‍ॅक्टला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणा-या रुंगठा यांच्या याचिकेसोबत सहअर्जदार देण्याचा प्रस्तावही चेन्नईच्या सभेत मांडण्यात आला.
*चेन्नईत कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी ललित मोदी यांचे वकिल महंमद अबिदी यांनी राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला.
*ललित मोदी यांना राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत सहभागी का करून घेण्यात आले, या विषयावरील चर्चेत बीसीसीआयने आपली बाजूही (राजस्थान क्रिकेट असोसिएशनची) ऐकून घ्यावी, असे अबिदी यांचे म्हणणे होते. त्यासाठीच राजस्थान क्रिकेट असोसिएशनने, अबिदी यांना चेन्नईच्या बैठकीसाठी अधिकृत प्रतिनिधी म्हणून कालच नियुक्त करून पाठवले होते.
*अबिदी यांना बैठकीच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केली आणि कार्यकारी समितीच्या बैठकीला उपस्थित राहू दिले नाही.
*राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे सचिव के. के. शर्मा यांनी बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांना पत्र पाठवून बीसीसीआयने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
* कार्यकारी समितीच्या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची परवानगी मिळणार नाही, असा निर्णय जर घेण्यात आला होता, त्याची कल्पना आम्हाला आधी दिली असती तर आमच्या असोसिएशनची मानहानी टळली असती, असेही शर्मा यांनी दिलेल्या या पत्रात म्हटले आहे.
* ‘राजस्थान स्पोर्ट्स अ‍ॅक्ट’ला रुंगठा यांनी आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यासोबत सहयाचिका दाखल करून बीसीसीआयने ललित मोदी यांच्यावर बंदी घालण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतच्या पूर्ततेची पडताळणी करावी, असे बीसीसीआय सदस्यांचे म्हणणे आहे.
आरसीएचे भवितव्य 6 जानेवारीला निश्चित!
19 डिसेंबर रोजी सर्वोच्च् न्यायालयाच्या निरीक्षकांच्या उपस्थितीत राजस्थान क्रिकेट असोसिएशनची निवडणूक घेण्यात आली होती. त्या निवडणुकीचे निकाल 6 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येतील, अशी अपेक्षा आहे. सर्वोच्च् न्यायालयापुढे राजस्थान क्रिकेट असोसिएशनची याचिका त्या वेळी सुनावणीसाठी येईल, अशी अपेक्षा आहे.