आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला बीसीसीआय आव्हान देणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आज नवी दिल्ली येथील बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाच्या चौकशी आयोगाच्या नियुक्तीबाबत दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज दिल्लीतील कार्यकारी समितीच्या बैठकीत बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा घेण्याच्या पवित्र्यात असलेल्या एन. श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा माघार घ्यावी लागली.


बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी पाठवलेल्या पत्रात ‘तातडीची’ (इमर्जन्सी) हा शब्द न घातल्यामुळे ती बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सर्वप्रथम श्रीनिवासन आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीसाठी हजर झाले. त्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या चौकशी आयोगाबाबतच्या निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे अरुण जेटली यांनी कौन्सिल सदस्यांपुढे मांडले. त्यानंतर आयपीएल कौन्सिलने त्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी विशेष सुटीकालीन याचिका (स्पेशल लिव्ह पिटिशन) दाखल करण्याचा निर्णय घेतला.


त्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत बोर्डाच्या अध्यक्षपदापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय श्रीनिवासन यांनी घेतला. त्यामुळे त्यानंतर होणा-या कार्यकारी समितीच्या बैठकीला काहीच अर्थ उरला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनिवासन यांनीच या बैठकीचे अध्यक्षपद आपल्याला भूषवण्यात रस नसल्याचे सांगितले. गव्हर्निंग कौन्सिलने सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीनिवासन यांनी स्वत:च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

न्यायालयाचा आक्षेप कशाला?
न्यायालयाने चौकशी समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीला घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. आयपीएल घटनेनुसार चौकशी समितीवर दोन बाह्य सदस्य आणि एक अंतर्गत पदाधिकारी असणे गरजेचे होते.
०येत्या सोमवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या वतीने सर्वोच्च् न्यायालयात मुंबई उच्च् न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यात येईल.
०आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत कौन्सिलने चौकशी आयोगाची नियुक्ती घटनेनुसार केल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
०चौकशी आयोगाची योग्य पद्धतीने स्थापना करण्यात आली असून आयोगाने घेतलेल्या निर्णयावरही सदस्य अनुकूल आहेत.
०इंडिया सिमेंट, जयपूर आयपीएल संघ, गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती.