आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयकडून प्रवीणकुमार निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेगवान गोलंदाज प्रवीणकुमारला निलंबित केले आहे. कॉर्पोरेट ट्रॉफीत खेळाडू आणि पंचांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावताना त्याला आगामी आंतरराज्य विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यास बीसीसीआयने मनाई केली आहे.

‘प्रवीण कुमारला मंडळाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आगामी आंतरराज्य विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला निलंबित करण्यात आले आहे,’ अशी माहिती बीसीसीआयने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

विजय हजारे ट्रॉफीसाठी उत्तर प्रदेशच्या 15 सदस्यीय संघात प्रवीणकुमारचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आता त्याला संघाबाहेर करण्यात आले आहे.रायपूर येथे मागच्या आठवड्यात झालेल्या कॉर्पोरेट चषक क्रिकेट स्पर्धेत खेळाडू व पंचांना शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याला लेखी खुलासा मागण्यात आला आहे.या सामन्यात प्रवीण ओएनजीसीकडून खेळला.

नेमके काय घडले होते ?
इन्कम टॅक्स वि. ओएनजीसी यांच्यातील सामन्यात प्रवीणकुमारने राडा केला होता. इन्कम टॅक्सचा फलंदाज अजित अरगलला त्याने शॉर्टपिच चेंडू टाकला. हा चेंडू नोबॉल तर नव्हता ना..हे पाहण्यासाठी फलंदाजाने पंचांना साद घातली. हे बघून प्रवीणकुमारने अरगलला शिवीगाळ करताना अभद्र हातवारेसुद्धा केले. यानंतर मैदानी पंचांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता प्रवीणने पंच कमलेश शर्मा आणि अजित दातार यांना सुद्धा शिवीगाळ केली.पंचांनी सामना संपल्यानंतर सामनाधिकारी धर्मेंद्रसिंग यांच्याकडे लेखी तक्रार केली. धर्मेंद्रसिंग सिंग यांनी पंचांच्या अहवालानंतर प्रवीणकुमार क्रिकेट खेळण्यासाठी मेंटली अनफिट असल्याचे म्हणून बीसीसीआयकडे सर्व माहिती दिली. यापूर्वीच्या सामन्यातसुद्धा प्रवीणने प्रेक्षकाशी वाद घातला होता.