आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Because Of Fielding Indian Team Respect Increased

क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियाचा मान वाढला !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीची समाप्ती रविवारी होणार आहे. फायनलमध्ये टीम इंडिया आणि यजमान इंग्लंड यांच्यात झुंज रंगेल. टीम इंडियाचा उत्साह पाहण्यासारखा आहे. मात्र, इंग्लंडची टीमसुद्धा आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे. आता धोनी ब्रिगेड काय चमत्कार करेल, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
तसे म्हटले तर टीम इंडियाने स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत केले. टीम इंडियाचे नवे रूप प्रशंसनीय असेच आहे. कारण, गेली अनेक वर्षे विदेशी भूमीवर आपला संघ फुसका ठरायचा. इतकेच नव्हे तर स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे निर्माण झालेला तणाव आणि दबाव दूर करून धोनी ब्रिगेडने आपले पूर्ण लक्ष खेळावर केंद्रित केले, यामुळे त्यांचे कौतुक करायला हवे.
फायनलबाबत बोलायचे झाल्यास इंग्लंडची टीम आपल्या घरच्या मैदानावर खेळेल. दुसरीकडे टीम इंडियाने आपल्या मागच्या इंग्लंड दौ-यात वनडे मालिका 3-0 ने गमावली होती. मात्र, आताच्या धोनी ब्रिगेडला हरवणे सोपे नाही. सध्याच्या भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अत्यंत जबरदस्त कामगिरी करीत आहे. क्षेत्ररक्षणाच्या बाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघ क्षेत्ररक्षणात एखाद्या अ‍ॅथलिटप्रमाणे चपळता दाखवत आहे. गेली अनेक वर्ष टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण इतक्या तोडीचे आणि इतके चांगले नव्हते. इतके दिवस ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडचे संघच दमदार क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जायचे. भारताने यापूर्वी कधीही क्षेत्ररक्षणावर इतका जोर दिला नव्हता. यामुळे आपल्या देशाच्या चांगल्या क्षेत्ररक्षकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी ठरली. मी गेल्या पन्नास वर्षांपासून क्रिकेट बघत आहे. मी फक्त नवाब पतौडी ज्युनियर, चंदू बोर्डे, एकनाथ सोलकर, आबिद अली, कपिल देव, अझरुद्दीन, मोहंमद कैफ आणि युवराजसिंग यांना चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहिले आहे. सध्याच्या भारतीय संघात तीन युवा सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांचे क्षेत्ररक्षण अप्रतिम असेच आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षणामुळेच टीम इंडियाबद्दल आश्चर्य वाटणारा सन्मान वाढला आहे. टीम इंडियाच्या युवांनी कमालीचे क्षेत्ररक्षण करून कर्णधार धोनीला आणखी शक्तिशाली केले आहे. भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात आलेल्या या सुधारणेचे श्रेय कर्णधार धोनीला जाते. त्याने युवा खेळाडूंना चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी प्रेरित केले. आता टीमच्या बाहेर असलेल्या खेळाडूंना संघात पुनरागमन करायचे असेल तर त्यांना क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुद्धा सुधारावा लागेल. मी क्षेत्ररक्षणाचा उल्लेख यासाठी करीत आहे की आता याला दुर्लक्षीत केले जाऊ शकत नाही. जेव्हा केव्हा भारतीय संघात चांगले क्षेत्ररक्षक होते, तेव्हा भारताने मोठे विजय मिळवले आहेत. उदाहरण घ्यायचे झाल्यास 1971 मध्ये वेस्ट इंडीज आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका, 1983 मध्ये वर्ल्डकप आणि 2007 मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्डकप चांगल्या क्षेत्ररक्षणामुळेच आपण जिंकू शकलो.
भारताने आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर फलंदाजी, गोलंदाजीशिवाय क्षेत्ररक्षणाचीही भूमिका यात महत्त्वाची असेल. चुकून आपला फायनलमध्ये पराभव जरी झाला तरीही धोनीने क्षेत्ररक्षणाबद्दल जी जागृती निर्माण केली आहे, त्याचा फायदा प्रदीर्घ काळ बघायला मिळेल.