मुंबई - विश्व अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा मुंबईत या खेळाच्या नव्या आविष्काराची झलक दाखवणारी ठरली. सहभागी झालेले देश किंवा अमेरिकन खेळाडू नव्हते. या गोष्टीपेक्षाही या स्पर्धेने अधोरेखित केलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुन्या परंपरांची जळमटे दूर करून हा खेळ नव्या आव्हानांना सामोरा जायला निघाला आहे.
महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धा यापुढे होणार नाहीत. त्याऐवजी महिलांसाठी सुदृढ, डौलदार, कमनीय बांधा, आखीव-रेखीव हे देहयष्टी आणि स्वत:ला सर्वोत्तमरीत्या सादर करणे अशा प्रकारांना महत्त्व येणार आहे. त्यामुळे उत्तेजकांचे सेवन किंवा अन्य उपचारांनी होणारे शरीरावरचे प्रयोग आणि अत्याचार थांबणार आहेत.
पुरुष विभागात मात्र या स्पर्धेने अपेक्षाभंग केला. स्पर्धेत ५० ते ५५ देश आले आहेत, असे आयोजक वारंवार सांगत होते. मात्र, अंतिम विजेतेपदापर्यंतचा प्रवास पाहिला तर इराण, थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूर आणि यजमान भारत यापलीकडे विश्व अजिंक्यपद अशी बिरुदावली मिरवणारी ही स्पर्धा मोठी दिसलीच नाही.
स्पर्धेचे आयोजन, व्यवस्था, पाहुण्यांचा पाहुणचार यामध्ये चेतन पाठारे व त्यांच्या सहका-यांनी बाजी मारली, हे खरे आहे. क्रीडाप्रेमी खासदार गजानन कीर्तिकरांनी पाच कोटी खर्चाचे अंदाजपत्रक असणा-या या स्पर्धेचे शिवधनुष्य उचलले. मात्र, भारतात शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने उदयाला आलेल्या एकापेक्षा अनेक संघटना अशा स्पर्धेच्या आयोजनाच्या वेळी एकत्र आल्या असत्या, तर अधिक रंगत आली असती. पुरुष विभागातील गुणवत्ता संघटना आणि व्यक्तींच्या विभाजनामुळे विभागली गेलेली वाटली.