मुंबई - महिलांसाठीची शरीरसौष्ठव स्पर्धा यापुढे होणार नाही. त्याऐवजी उत्कृष्ट शरीरसंपदा स्पोर्टस फिजिक, अॅथलेटिक फिजिक अशा गटांसाठी स्पर्धा होणार आहेत. सर्वोत्कृष्ट पीळदार देहयष्टीसाठी अहोरात्र मेहनत घेणा-या महिलांसाठी आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवाचे दरवाजे कायमचे बंद होणार आहेत. मात्र, त्याच वेळी स्वत:च्या शरीरसौष्ठवाला उत्कृष्ट रीतीने सादर करणा-या महिलावर्गासाठी नवी दालने खुली होणार आहेत. आज मुंबईतील विश्व अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत स्वत:च्या शरीरसंपदेला सादर करताना हंगेरीपासून अन्य युरोपियन देशांच्या विजेत्यांनी त्यांच्या वेशभूषा आणि महागड्या वस्त्रप्रावरणांवर लाखो रुपये खर्च केल्याचे लक्षात येते. युरोपियन बॉडिबिल्डिंग फेडरेशनच्या सचिव इर्निको बर्निस यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेली माहिती तोंडात बोटे घालायला लावणारी आहे.
बर्निस यांच्या अनेक हंगेरियन शिष्यांना पदकावर डल्ला मारला आहे. त्या म्हणत होत्या, ‘या महिला
आपल्या शरीरसौष्ठवाइतक्याच आपल्या ब्रेसियर्स, पँटीज्, शूज, रिस्ट बँड, नखांचा रंग, त्यावरील नक्षीकाम, डोक्यावरील शिरस्त्राणावरची बेलबुट्टी, नक्षीकाम आदींबाबत खूपच सजग आहेत. बर्निस म्हणत होत्या, विजेत्यांच्या ब्रेसियर्स अडीच हजार डॉलर्सच्या जवळपास किमतीच्या आहेत. कारण हंगेरीच्या त्या खेळाडूच्या ब्रेसिअर्सवर सोरोस्कीचे असंख्य हिरे आहेत. त्या हि-यांची किंमत आणि संख्या यांच्या पटीत ब्रेसियर्सची किंमत वाढत जाते. बर्निस म्हणतात, ब्रेसियर्सची किंमत किमान ५० डॉलर्स मोजवीच लागते. बुटांसाठी २०० डॉलर्सपासून किंमत सुरू होते. या शूजची उंची २ सें.मी.पर्यंतच, तर हिल ३ सें.मी.पर्यंतच मान्य करण्यात आले आहेत. कानातले इअररिंग, हातातील ब्रेसलेट्स अशा प्रकरणांचा खर्च सुरू होतो ६० अमेरिकन डॉलर्सपासून. प्रत्येकीला केशभूषा करण्यासाठी हेअर ड्रेसर्सकडे जावेच लागते. त्यासाठी स्वत:च्या हेअर ड्रेसर्सही काहींनी ठेवल्या आहेत.
‘टॅनिंग’चे तंत्र
कातडीचा रंग चॉकलेटी करण्यासाठी ‘टॅनिंग’चे तंत्र वापरावे लागते. त्यासाठी १०० डॉलर्सपुढचा खर्च सुरू होतो. स्वत:साठी एका मानसशास्त्रज्ञाचीही नियुक्ती करावी लागते.हाही मोठा खर्च असतो.