आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अ‍ॅशेस\'चा रोमांचः हॅडीनची झुंज अपयशी, इंग्‍लंडचा थरारक विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉटींघम- इंग्‍लंड आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍या सुरु असलेल्‍या अ‍ॅशेस क्रिकेट मालिकेतील पहिलाच कसोटी सामना अतिशय रोमांचक झाला. ब्रॅड हॅडीन आणि जेम्‍स पॅटीन्‍सन ही जोडी ऑस्‍ट्रेलियाला विजय मिळवून देणार, असे वाटत असतानाच जेम्‍स अ‍ॅंडरसनने एक जादुई चेंडू टाकला आणि इंग्‍लंडचा विजय साकारला. ब्रॅड हॅडीनला त्‍याने बाद करुन इंग्‍लंडला 14 धावांनी विजयी केले.

इंग्‍लंडचा दुसरा डाव काल (शनिवारी) 375 धावांवर आटोपल्‍यानंतर कांगारुंना विजयासाठी 311 धावांचे आव्‍हान मिळाले होते. परंतु, कांगारुंचे 6 फलंदाज 174 धावांवर कालच बाद झाले होते. आज ब्रॅड हॅडीन आणि अ‍ॅस्‍टन अ‍ॅगर या जोडीने विजयाचे आव्‍हान खांद्यावर घेतले. हॅडीनने झुंझार अर्धशतकी खेळी करताना तळाच्‍या फलंदजांसोबत महत्त्वाच्‍या भागीदा-या केल्‍या. सर्वप्रथम त्‍याने ऍगरसोबत 43 धावांची भागीदारी केली. त्‍यानंतर पीटर सिडलसोबत त्‍याने 20 धावा जोडल्‍या. परंतु, शेवटच्‍या विकेटसाठी सर्वाधिक महत्त्वाची भागीदारी हॅडीन आणि जेम्‍स पॅटीन्‍सनने केली. दोघांनी उपहारापर्यंत 60 धावा जोडल्‍या. याच भागीदारीने ऑस्‍ट्रेलियाला विजयाच्‍या जवळ नेले.

जेम्‍स पॅटीन्‍सनने 1 षटकार आणि 2 चौकार ठोकले. तर हॅडीनने आक्रमण आणि संयमाचा ताळमेळ साधला. त्‍याने 9 चौकार ठोकले. इंग्‍लंडच्‍या क्षेत्ररक्षकांनीही काही संधी वाया घालवल्‍या. जेम्‍स अ‍ॅंडरसनने 5 बळी घेऊन ऑस्‍ट्रेलियाच्‍या फलंदाजीचे कंबरडे मोडले. आजच्‍या चारही विकेट्स त्‍यानेच घेतल्‍या.