साओ पावलो - ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी
आपल्या आजाराबाबत काळजी करण्यासारखे काहीच गंभीर नसल्याचे म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना येथील अल्बर्ट आइन्स्टाइन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा रुग्णालय व्यवस्थापनाकडून पेलेंची तब्येत गंभीर असून त्यांना दक्षता विभागात ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. ७४ वर्षीय पेले यांनी
ट्विटरवरून या वृत्ताचे खंडन केले आहे. मूत्रपिंडाचा त्रास जाणवल्याने मी रुग्णालयात दाखल झालो आहे. मला दक्षता विभागात कधीच ठेवण्यात आले नाही.
खबरदारीच्या दृष्टिकोनातून विशेष कक्षात स्थलांतरित केले होते. पेले यांच्या मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करून खडा काढण्यात आला होता. मात्र, त्यांच्या मूत्रपिंडात जखम आढळल्याने निदानासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाहत्यांच्या प्रेमामुळे व देवाच्या आशीर्वादाने आगामी वर्षाची चांगली सुरुवात करेन, असेही ते म्हणाले.