आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉन्फेडरेशन चषक : ब्राझीलची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिओ दि जानेरिओ - पाच वेळचा विश्वविजेता ब्राझीलने सलग तिस-यांदा कॉन्फेडरेशन चषक जिंकला. या संघाने अंतिम सामन्यात वर्ल्ड आणि युरोपियन चॅम्पियन स्पेनचा 3-0 अशा फरकाने पराभव केला. या एकतर्फी विजयासह यजमान संघाने चषकावर नाव कोरले. यासह ब्राझीलने 29 सामन्यांतील स्पेनची विजयाची मोहीम खंडित केली. संघाच्या विजयात फ्रेडने दोन गोल व ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार विजेता नेमार ज्युनियरने एक गोल केला. फर्नांडो टोरेस ‘गोल्डन बुटचा’ मानकरी ठरला.


माराकाना स्टेडियमवर हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत यजमान संघाने शेवटपर्यंत सामन्यात आपला दबदबा कायम ठेवला. या वेळी चाहत्यांनी स्पेनविरुद्ध नारेबाजी करून फुटबॉल किंग ब्राझीलने पुनरागमन केल्याची घोषणा केली.


फ्रेडचा पहिला गोल
दोन आठवड्यांपूर्वी ब्राझीलने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात जपानविरुद्ध तिस-याच मिनिटाला गोलचे खाते उघडले होते. मात्र, यापेक्षाही वेगवान खेळी यजमान संघाच्या खेळाडूंनी स्पेनविरुद्ध सामन्यात केली. ब्राझीलचे चाहते राष्टÑगीतानंतर खुर्चीवर बसण्याआधीच फ्रेडने सामन्यात पहिला गोल केला. त्याने सामन्याच्या दुस-याच मिनिटाला ही उल्लेखनीय कामगिरी केली. आठव्या मिनिटाला ऑस्करला ब्राझीलच्या आघाडीला मजबूत करण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्याला या संधीचे सोने करता आले नाही. सामन्याच्या 14 व्या मिनिटाला स्पेनच्या गोलरक्षकाने प्रतिस्पर्धी संघाच्या पोलिन्होचा गोल करण्याचा प्रयत्न अपयशी ठरवला. यजमानांच्या आक्रमक खेळीमुळे अडचणीत सापडलेल्या स्पेनला धक्का देण्यासाठी नेमारने गोलचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश मिळाले नाही.


ब्राझीलच्या त्रिकुटाची कमाल
यजमान ब्राझील संघाच्या फ्रेड, नेमार आणि पोलिन्होने सामन्यात चमकदार कामगिरी केली. या तिघांच्या आक्रमक खेळीच्या बळावर ब्राझीलने सामना आपल्या नावे केला. या तिघांच्या खेळाची तोड स्पेनला अखेरपर्यंत सापडली नाही. तिघांच्या आक्रमक खेळाने बाजी मारली.


नेमारचा अचूक गोल
मध्यंतरापूर्वी ऑस्करने नेमारकडे चेंडू पास केला. याचा फायदा घेत नेमारने अचूक गोल केला. त्याने या गोलसाठी विशेष असे डावपेच आखले होते. हे डावपेच यशस्वी करून त्याने गोल केला.


फ्रेडने केला तिसरा गोल
दुस-या हाफच्या अवघ्या दुस-या मिनिटाला फ्रेडने गोल केला. पोलिन्होने चेंडूला फ्रेडकडे पास केला. याचा फायदा घेत त्याने संघाकडून तिसरा गोल केला. तीन गोलने पिछाडीवर पडलेल्या स्पेनच्या सामन्यातील अडचणी वाढतच गेल्या.


सामन्यातील रोमांचक क्षण
०दुस-या हाफमध्ये सर्जिओ रामोसने पेनॉल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी हुकवली.
०मध्यंतरानंतर लढतीत स्पेनच्या गेरार्ड पिकने नेमारला खाली पाडले. दरम्यान, पंच ब्योर्न कुइपर्स यांनी पिकला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.
०पहिल्या हाफच्या चार मिनिटांपूर्वी, पेड्रोने ब्राझीलच्या गोलरक्षकाला हुलकावणी देऊन आगेकूच केली. मात्र, लुईजने गोल लाइनवर पेड्रोला रोखून स्पेनचा बरोबरी मिळवण्याचा प्रयत्न उधळून लावला.


37 वर्षांनंतर दुसरा मोठा पराभव
स्पेनचा कधीही मोठा पराभव झाला नाही. 37 वर्षांपूर्वी युरोपियन पात्रता फेरीत वेल्सने स्पेनवर 3-0 ने एकतर्फी विजय मिळवला होता. कॉन्फेडरेशन चषकातही ब्राझीलने स्पेनला 3-0 ने पराभूत केले. हा स्पेनचा दुसरा मोठा पराभव ठरला.


आत्मविश्वास वाढला
आमचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. खेळाडूंनीही चांगली कामगिरी करून आमच्या इच्छा पूर्ण केल्या.
फेलिप स्कोलारी, प्रशिक्षक, ब्राझील संघ


नशिब दुर्देवी
दोन्ही हाफच्या सुरुवातीला आमचे नशिब चांगले राहिले नाही. मात्र, मी कोणतीही पळवाट शोधत नाही. ब्राझीलने चांगला खेळ केला. विन्सेंट डेल बोस्क, प्रशिक्षक, स्पेन संघ