आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौतम गंभीरला अद्यापही कर्णधार धोनीची पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल न्यूज रूम - भारतीय संघात तिस-या सलामीवीराच्या रूपात कर्णधार महेंद्रसिंग धोनीला अद्यापही गौतम गंभीरच उत्तम पर्याय वाटतो. दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना धोनीने तसे बोलूनही दाखवले आहे. त्याने सांगितले की, गंभीरची निवड झाली नसली तरी संघात तिसरा सलामीवीर म्हणून आमच्या डोक्यात गंभीरचेच नाव आहे. धोनीने केलेल्या या विधानामुळे हा बीसीसीआयच्या रणनीतीचाच एक भाग असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गौतम गंभीर लवकरच पुनरागमन करण्याची शक्यता दिसून येत आहे.
वनडेत ठरला होता फ्लॉप
डावखुरा फलंदाज गौतम गंभीरने कसोटीत निराशाजनक कामगिरी केली नसली तरी तो एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नव्हता. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याने क्रमश: 53, 8, 33, 10 आणि 24 अशा धावा काढल्या होत्या. याच निराशाजनक प्रदर्शनामुळे त्याची भारतीय संघातून हकालपट्टी करण्यात आली होती.
गंभीर सध्या फॉर्ममध्ये
दिल्लीचा डावखुरा फलंदाज गौतम गंभीर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने चालू हंगामात दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत. वर्षभरापासून भारतीय संघाबाहेर असलेल्या गंभीरने डिसेंबर 2012 मध्ये नागपुरात इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात त्याने 37 धावांची खेळी साकारली होती.
गंभीरची कामगिरी
कसोटी
4021 धावा
09 शतके
21 अर्धशतके
वनडे
5238 धावा
11 शतके
34 अर्धशतके
हंगामातील कामगिरी
123 भारत अ विरुद्ध वेस्ट इंडीज (7-9 डिसेंबर 2013, सुरत)
153 दिल्ली विरुद्ध हरियाणा (21 ते 24 नोव्हेंबर 2013, नवी दिल्ली)
64 आणि 51 दिल्ली विरुद्ध मुंबई (14 ते 17 नोव्हेंबर 2013)
शेवटचे चार डाव (2012)
65 विरुद्ध इंग्लंड (मुंबई कसोटी, पहिला डाव)
60 विरुद्ध इंग्लंड (कोलकाता कसोटी, पहिला डाव)
40 विरुद्ध इंग्लंड (कोलकाता कसोटी, दुसरा डाव)
37 विरुद्ध इंग्लंड (नागपूर कसोटी, पहिला डाव)
कोणत्याही आव्हानासाठी सज्ज
सध्या माझे पूर्ण लक्ष स्थानिक स्पर्धेवरआहे. भारतीय संघातून बाहेर पडलो याचे मला दु:ख नाही. परंतु आता पूर्वीपेक्षा अधिक परिपक्व आहे. त्यामुळे कोणत्याही आव्हानासाठी पुन्हा एकदा तयार आहे. - गौतम गंभीर