आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार धोनीने रैना , जडेजा या दोघांना संघाबाहेर करण्याची दिली धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तिरंगी मालिकेत वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा एकमेकांना भिडल्यामुळे या दोघांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) फटकारले आहे. मंडळाने प्रकरण गांभीर्याने घेत दोघांकडून लेखी उत्तर मागितले आहे.


मागच्या शुक्रवारी वेस्ट इंडीजविरुद्ध सामन्यात जडेजाच्या चेंडूवर रैनाकडून दोन वेळेस झेल सुटला होता. यावर जडेजा भडकला. रैना त्याला स्पष्टीकरण देण्यास पोहोचला त्या वेळी जडेजाने त्याचे काहीही न ऐकता त्याला धुडकावून लावले. बीसीसीआयने दौरा व्यवस्थापक रंजित बिस्वाल आणि प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांना या प्रकरणी लेखी स्पष्टीकरण मागितले आहे.


पुन्हा चूक केल्यास याद राखा : धोनीची ताकीद
रैना आणि जडेजा एकमेकांशी भिडल्यामुळे महेंद्रसिंग धोनी चांगलाच नाराज होता. नाराज असल्यामुळे दिवसभर धोनी त्या दोघांशी एक शब्द बोलला नाही. दुस-या दिवशी माहीने दोघांना हॉटेलातील आपल्या खोलीत बोलावले. त्या वेळी संघ व्यवस्थापक आणि प्रभारी कर्णधार विराट कोहलीसुद्धा उपस्थित होते. धोनीने दोघांना चांगलेच फटकारले. इतकेच नव्हे तर भविष्यात अशी चूक पुन्हा केल्यास संघाबाहेर करण्याची धमकीसुद्धा दिली.


रैनाने जाणूनबुजून झेल सोडला नाही
संघाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक सुरेश रैनाने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर जाणूनबुजून झेल सोडला नाही. पहिला झेल यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडे आला होता. मात्र, तो चुकला आणि चेंडू त्याच्या पॅडला लागून उसळला. त्याला रैना पकडू शकला नाही. याचप्रमाणे दुसरा झेल भुवनेश्वरकुमार आणि रैना या दोघांच्या मध्ये सुटला. दोन्ही वेळेस झेल आपल्याकडे थेट आला नाही, असे रैनाचे म्हणणे होते. मात्र, जडेजा त्याचे काहीएक ऐकण्यास तयार नव्हता.


जडेजाने रैनाला डिवचले
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र जडेजाने सुरुवातीला सुरेश रैनाला डिवचले. कर्णधारपद मिळाले नाही म्हणून तू मन लावून क्षेत्ररक्षण करीत नाहीस, असा थेट आरोप जडेजाने रैनावर केला. यामुळे रैना भडकला. त्याला हे म्हणणे पटले नाही. कारण असे काहीच घडले नव्हते. चेन्नई सुपरकिंग्जकडून दोघेही एकत्र खेळत असताना जडेजा अचानक का भडकला, यामुळेसुद्धा रैना चकित होता. प्रभारी कर्णधार विराट कोहली आणि इशांत शर्मा यांनी मध्यस्थी केल्यानंतरही जडेजा तापलेलाच होता.


संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, मुरली विजय, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वरकुमार, इशांत शर्मा, उमेश यादव, अमित मिश्रा.

श्रीलंका : अँग्लो मॅथ्यूज (कर्णधार), उपुल थरंगा, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, दिनेश चांदिमल, लाहिरु थिरिमाने, नुवान कुलशेखरा, रंगना हेराथ, लेसिथ मलिंगा, अजंता मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, तिसरा परेरा.