आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी वेळेत काम पूर्ण करण्याचे आव्हान - रवी सावंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बीसीसीआयची वार्षिक सभा लवकरच होणार आहे. त्या आधी कोशाध्यक्षाची कामे पूर्ण करण्याचे आव्हान आहे. ते आव्हान यशस्वीरीत्या पार पाडण्याचा संकल्प करूनच कोशाध्यक्षपदाचे उर्वरित काम पूर्णावस्थेत नेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बीसीसीआयचे नवे कोशाध्यक्ष रवी सावंत यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना नवा संकल्प सांगितला.


रवी सावंत पुढे म्हणाले, मी 38 वर्षे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम पाहत आहे. त्यामुळे कोशाध्यक्षाची कामे ही माझ्यासाठी ‘रुटिन’ कामे आहेत. मात्र, मला गेली दोन वर्षे कोशाध्यक्ष असलेल्या शिर्के यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारायची आहे. त्यांनी ‘चार्ज’ दिला की, मगच माझे काम सुरू होईल.


अवघ्या महिन्याच्या कालावधीत मला हिशेब पूर्ण करावे लागतील. ते काम वेळेत करण्याचे खरे आव्हान आहे.
हे आव्हान पेलताना स्वत:ची आणि बीसीसीआयची प्रतिमा उंचावणे हे दुसरे महत्त्वाचे काम आहे. कोशाध्यक्ष म्हणून मी गेली 18 ते 20 वर्षे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काम पाहिले आहे. हिशेबात पारदर्शकता असावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील होतो. बीसीसीआयच्या कोशाध्यक्षपदाची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे, कोशागाराच्या कामकाजात पारदर्शकता असावी हा असेल. माझ्या पारदर्शक कामाद्वारे स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करावी, हा माझा प्रयत्न असेल.


रवी सावंत यांची अजय शिर्के यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या कोशाध्यक्षपदी तर संजय जगदाळे यांच्या जागी सचिवपदी संजय पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. आज नवी दिल्ली येथील कार्यकारिणीच्या बैठकीत रवी सावंत व संजय पटेल यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र, या दोन्ही नियुक्त्या एन. श्रीनिवासन यांच्या मर्जीनेच झाल्या. त्यांनी या दोघांच्या नावांना हिरवा कंदील दाखवल्यानंतरच आज अधिकृत घोषणा करण्यात आली.