आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champion League T 20 : Today Shikhar Dhawan Maclum Stand Each Other

चॅम्पियन्स लीग टी-20: शिखर धवन-मॅक्लुम यांच्यात आज रंगणार मुकाबला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या पात्रता सामन्यात शुक्रवारी शिखर धवन व ब्रेंडन मॅक्लुम समोरासमोर असणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि न्यूझीलंडचा ओटागो वोल्टस यांच्यात सामना रंगणार आहे. पीसीए स्टेडियमवर रात्री आठ वाजता हा सामना होणार आहे. दुसरीकडे दुपारी चार वाजता पाकचा फैसलाबाद वुल्व्हज व श्रीलंकेचा कंडुराता मॅरुन्स यांच्यात सामना होईल. सलग दोन पराभवामुळे हे दोन्ही संघ मुख्य फेरीतील प्रवेशाच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. हैदराबाद व ओटागोने दोन विजयांसह मुख्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. मात्र, अव्वल स्थानासाठी यांच्यात मुकाबला होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान होईल. हैदराबाद व ओटागो संघाच्या नावे प्रत्येकी आठ गुण आहेत. मात्र, नेट रनरेटच्या आधारे हैदराबादचे पारडे अधिक जड आहे. तसेच या संघाकडे पार्थिव पटेल, जेपी ड्युमिनी, डॅरेन सॅमीसारखे अनुभव दिग्गज फलंदाज आहेत. सांमत्रे आणि हनुमा विहारीसारखे युवा फलंदाजही दमदार खेळीसाठी सक्षम आहेत.
येत्या 21 सप्टेंबर, शनिवारपासून मुख्य फेरीला प्रारंभ होईल. जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर उद्घाटनीय सामना राजस्थान आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होईल. सचिनच्या मुंबई इंडियन्सने 2011 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.


ओटागोची कंडुराता मॅरुन्सवर मात
रेयान टेन डोश्चेटने (2 विकेट, 64 धावा) डबल धमाका उडवून ओटागोला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडच्या संघाने कंडुराता मॅरुन्सवर 6 गड्यांनी मात केली. यासह ओटागो संघाने मुख्य फेरीत प्रवेश केला. या संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. श्रीलंकेच्या कंडुराताने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 154 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात ओटागोने 18 षटकांत लक्ष्य गाठले. अष्टपैलू कामगिरी करणारा रेयान सामनावीर ठरला. धावांचा पाठलाग करणा-या ओटागोकडून रुदरफोर्ड व बू्रमने चार षटकांत 31 धावा काढल्या. दरम्यान, 20 धावांवर रुदरफोर्ड बाद झाला. रेयानने 32 चेंडूंत 64 धावांची खेळी केली. त्याने सलग तीन षटकार ठोकले.


हैदराबादकडून फैसलाबादचा पराभव
सनरायझर्स हैदराबादने सलग दुस-या पात्रता फेरीतील सामना जिंकून चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला. या संघाने पात्रता फेरीत पाकच्या फैसलाबाद वुल्व्हजचा पराभव केला. हैदराबादने 7 गड्यांनी सामना जिंकला. अमित मिश्रा (1/13) आणि शिखर धवन (59) हे संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मिश्रा सामनावीर ठरला. पराभवासह पाकच्या मिसबाह-उल-हकचा फैसलाबाद वुल्व्हज मुख्य फेरीतील प्रवेशाच्या स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. पीसीए स्टेडियमवर पाकच्या फैसलाबाद संघाने विजयासाठी हैदराबादसमोर 128 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताच्या संघाने 17.3 षटकांत लक्ष्य गाठून प्रवेशही निश्चित केला. शिखर धवन व पार्थिव पटेलने 68 धावांची भागीदारी केली.


आजचे सामने
फैसलाबाद वुल्व्हज वि. कंडुराता मॅरुन्स
वेळ : दुपारी 4 वाजता
स्थळ : पीसीए स्टेडियम, मोहाली
सनरायझर्स हैदराबाद वि. ओटागो वोल्टस
वेळ : रात्री 8 वाजता
स्थळ : पीसीए स्टेडियम, मोहाली