आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champion Trophy: Rain Disturbed Australia New Zealand Match

चॅम्पियन्स ट्रॉफी: पावसाच्या अडथळ्यामुळे ऑस्‍ट्रेलिया-न्यूझीलंड सामना अनिर्णीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत अ गटातील सामन्यात ना ऑस्ट्रेलियाची टीम जिंकली ना न्यूझीलंडचा पराभव झाला. न्यूझीलंडच्या डावात पावसाचा व्यत्यय आल्याने सामना पूर्ण होऊ शकला नाही. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. न्यूझीलंडकडे आता दोन सामन्यांत 3 गुण झाले असून, ऑस्ट्रेलियाकडे फक्त एक गुण आहे.


अ‍ॅडम वोग्स (71) आणि जॉर्ज बेली (55) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने 8 बाद 243 धावा काढल्या. विरोधी संघ न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिचेल मॅकक्लीनेगनने 65 धावांत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. पावसामुळे सामना थांबला त्या वेळी प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 2 बाद 51 धावा काढल्या होत्या. त्या वेळी केन विल्यम्समन 18 आणि रॉस टेलर 9 धावांवर नाबाद होते.


शेन वॉटसन, ह्यूज फ्लॉप
तत्पूर्वी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्यास आलेल्या ऑस्ट्रेलियाने सलामीवीर शेन वॉटसन (5), तिस-या क्रमांकाचा फलंदाज फिलिप ह्यूज (0) यांच्या विकेट दहा धावांच्या आत गमावल्या. मात्र, मॅथ्यू वेड (29), कर्णधार जॉर्ज बेली (55), अ‍ॅडम वोग्स (71), मिशेल मार्श (22) आणि ग्लेन मॅक्सवेल (नाबाद 29) यांनी शानदार फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला 243 धावांपर्यंत पोहोचवले. बेली आणि वोग्स यांनी चौथ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी केली. वोग्स आणि मार्श यांनी नंतर पाचव्या विकेटसाठी 42 धावा जोडल्या. ऑस्ट्रेलियाने यानंतर 26 धावांच्या अंतरात चार विकेट गमावल्या. मात्र मॅक्सवेलने तुफानी फलंदाजी करून आव्हानात्मक स्कोअर उभा करण्यास मदत केली.


वोग्स, बेलीने डाव सावरला
ऑस्ट्रेलियाची टीम 3 बाद 74 अशी संकटात सापडली असता कर्णधार जॉर्ज बेली मदतीला धावून आला. बेलीने 91 चेंडूंचा सामना करताना 5 चौकारांच्या मदतीने 55 धावांची संथ खेळी केली. मात्र, त्याने विकेट पडू दिली नाही. नंतर अ‍ॅडम वोग्सने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 76 चेंडूंत 7 चौकारांसह 71 धावा कुटल्या.


संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 8 बाद 243 धावा. (जॉर्ज बेली 55, अ‍ॅडम वोग्स 71, 4/65 मॅकक्लीनेगन, 2/46 नॅथन मॅक्लुम), न्यूझीलंड : 15 षटकांत 2 बाद 51 धावा. (रोंची 14, केन विल्यम्समन नाबाद 18, रॉस टेलर नाबाद 9, 2/10 क्लायंट मॅके).
निकाल : सामना अनिर्णीत. (प्रत्येकी एक गुण)