आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champion Trophy: Today India Challeng Before The Windies

चॅम्पियन्स ट्रॉफी: भारतासमोर आज विंडीजचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत एकेक सामना जिंकणा-या दोन टीम भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात मंगळवारी लढत रंगेल. वेस्ट इंडीज संघात क्रिस गेल, केरोन पोलार्ड आणि डेवेन ब्राव्होसारखे स्टार खेळाडू असून या खेळाडूंनी आयपीएल-6 मध्ये दमदार कामगिरी केली होती. यामुळे ही लढत रोमांचक होण्याची शक्यता आहे.


भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब गटातील पहिल्या लढतीत द. आफ्रिकेला 26 धावांनी हरवले होते. दुसरीकडे वेस्ट इंडीजने आपल्या पहिल्या लढतीत पाकिस्तानला रोमांचक सामन्यात 2 विकेटने मात दिली. टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज हे दोन्ही संघ तुल्यबळ असून आपण कॅरेबियन संघाला कमी लेखू शकत नाही.


कार्तिकवर असेल लक्ष
आयपीएल-6 मध्ये जवळपास अर्धा डझन सामन्यात सुमार कामगिरी करणा-या रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफीत अर्धशतकाने सुरुवात केली. मात्र, सराव सामन्यात दोन शतके ठोकणा-या दिनेश कार्तिकला द. आफ्रिकेविरुद्ध फक्त 14 धावाच काढता आल्या. वेस्ट इंडीजविरुद्ध कार्तिककडून मोठ्या खेळीची आशा असेल.


वेस्ट इंडीजचे शक्तिस्थान
वेस्ट इंडीज संघात क्रिस गेल, केरोन पोलार्ड आणि मार्लोन सॅम्युअल्स तसेच डेवेन ब्राव्होसारखे दणकट फलंदाज आहेत. या फलंदाजांसमोर धावा रोखताना विकेट घेण्याचा प्रयत्न भारतीय गोलंदाजांना करावा लागेल.


गोलंदाजीत यांच्याकडून आशा
वेस्ट इंडीजला गोलंदाजीत केमर रोचशिवाय जादुई फिरकीपटू सुनील नारायणकडून चांगल्या कामगिरीची आशा असेल. याशिवाय रवी रामपॉल, केरोन पोलार्ड, डेवेन ब्राव्हो कमाल करू शकतात. रोच आणि सुनील नारायण पहिल्या सामन्यात यशस्वी ठरले होते.


चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-विंडीज लढती
1998/99
वेस्ट इंडीज वि.वि. भारत, 6 विकेट
2006/07
वेस्ट इंडीज वि.वि. भारत, 3 विकेट
2009/10
भारत वि.वि. वेस्ट इंडीज, 7 विकेट


यांच्याकडूनही आशा
कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, अष्टपैलू रवींद्र जडेजा हे संघातील इतर महत्त्वाचे फलंदाज आहेत. हे खेळाडू कॅरेबियन संघाच्या अडचणी वाढवू शकतात. यातील कोणताही खेळाडू मॅचविनरची भूमिका पार पाडू शकतो.


धवन आहे सरप्राइज पॅकेज
द. आफ्रिकेविरुद्ध सलामीवीर शिखर धवन सरप्राइज पॅकेज ठरला. शिखरने 114 धावांची खेळी करीत संघातील आपले स्थान जवळपास पक्के केले. त्याच्या या खेळीमुळे सलामीसाठी शर्यतीत असलेल्या इतर खेळाडूंसमोरील अडचणी वाढल्या आहेत.


विंडीजची टीम मजबूत
क्रिस गेल, केरोन पोलार्ड, सॅम्युअल्सशिवाय जॉन्सन चार्ल्स, रामनरेश सरवन हेसुद्धा चांगले फलंदाज आहेत. मात्र, या खेळाडूंच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे.


गोलंदाजांनी केले निराश
द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी सुमार दर्जाची राहिली. भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, ईशांत शर्मा, रविचंद्रन अश्विन, अष्टपैलू जडेजा यांच्यासमोर चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असेल.

थेट प्रक्षेपण स्टार क्रिकेटवर दुपारी 3.00 वाजता