आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champion Trophy: Today Team India Fighting With Lankan Tiger

टीम इंडिया करणार आज लंकन वाघाची शिकार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्डिफ - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना टीम इंडिया आणि श्रीलंकेत गुरुवारी खेळवला जाईल. दोन्ही संघ यापूर्वी 2011 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये समोरासमोर होते. त्या वेळेसच्या वर्ल्डकप फायनलच्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न श्रीलंकेचा असेल. दुसरीकडे धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणखी एक विजेतेपद जिंकण्यासाठी फायनलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल.


आणखी एक विशेष म्हणजे 2002-03 मध्ये भारत आणि श्रीलंका दोघेही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत संयुक्त विजेता होते. उपांत्य सामन्यात टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत श्रीलंकन वाघांची शिकार करण्यास इच्छुक असेल. ही अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी असून यावर नाव कोरण्यास धोनी ब्रिगेड आतुर आहे. इंग्लंडच्या भूमीवर दोन्ही संघ पाच वेळा एकमेकांशी लढले आहेत. यात चार वेळा भारताने, तर एक वेळा श्रीलंकेने विजय मिळवला. जुनी आकडेवारी भारताच्या बाजूने असली तरीही ही लढत वाटते तितकी सोपी ठरणार नाही. कारण दोन्ही संघांना एकमेकांच्या खेळाची पूर्ण कल्पना आहे. श्रीलंकेचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत असल्याने त्यांच्या उणिवा धोनीस माहिती आहेत. याचप्रमाणे श्रीलंकेलासुद्धा भारताची आवश्यक माहिती आहे.
धवन, जडेजाकडे लक्ष : भारतीय संघाकडून सध्या तुफान फॉर्मात असलेले युवा खेळाडू शिखर धवन आणि रवींद्र जडेजा यांच्या कामगिरीकडे तमाम चाहत्यांचे लक्ष असेल.


टीम इंडियाची मजबूत बाजू
दोन्ही सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात आहेत. स्पर्धेत दोघांनी दोन वेळा शतकी आणि एक वेळा अर्धशतकी भागीदारी केली. शिखर धवनने दोन शतके, तर रोहितने दोन अर्धशतके झळकावली आहेत. टीम इंडियाने ऑलराउंड प्रदर्शन करून साखळीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. सध्या टीम इंडिया फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीत चांगले प्रदर्शन करीत आहे. फलंदाजीत युवा फलंदाज कोहली, कार्तिक लयीत आहेत.


श्रीलंकेची मजबूत बाजू
कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान आणि महेला जयवर्धनेच्या रूपाने तीन अनुभवी फलंदाज धावांचा डोंगर उभा करू शकतात. कुशल परेरा, दिनेश चांदिमल आणि लाहिरू थिरिमानेसुद्धा धावा काढण्यात कुशल आहेत. अँग्लो मॅथ्यूज, तिसरा परेरा अष्टपैलूची भूमिका पार पाडतील. गोलंदाजीत नुवान कुलशेखरा, रंगना हेराथ, एस. इरंगा आणि लसिथ मलिंगा भारताला अडचणीत आणू शकतात. मलिंगा आतापर्यंत तसा महागडा ठरला आहे. मात्र, तो भारताला त्रासदायक ठरू शकतो.


दोन्ही संघांच्या दुबळ्या बाजू
भारत : सुरेश रैना शॉर्टपिच चेंडूंचा सामना समर्थपणे करू शकत नाही. ईशांत शर्मा स्लॉग ओव्हरमध्ये दुबळा ठरतो. त्याला यॉर्करसुद्धा नीट टाकता येत नाही.
श्रीलंका : सलामीवीर कुशल परेरा तिन्ही सामन्यांत फ्लॉप ठरला. कर्णधार अँग्लो मॅथ्यूज फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत लयीत नाही.


संभाव्य संघ असे
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, ईशांत शर्मा.
श्रीलंका : अँग्लो मॅथ्यूज (कर्णधार), कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, कुमार संगकारा, थिरिमाने, दिनेश चांदिमल, महेला जयवर्धने, तिसरा परेरा, रंगना हेराथ, इरंगा, मलिंगा, कुलशेखरा.


भारताचे प्रदर्शन
भारत वि. वि. द. आफ्रिका, 26 धावांनी
भारत. वि. वि. वेस्ट इंडीज, 8 विकेटने
भारत वि. वि. पाकिस्तान, 8 विकेटने


श्रीलंकेची कामगिरी
श्रीलंका पराभूत विरुद्ध न्यूझीलंड,एका विकेटने
श्रीलंका वि. वि. इंग्लंड, 7 विकेटने
श्रीलंका वि. वि. ऑस्ट्रेलिया, 20 धावांनी