आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Champion Trophy : Today Will Decide Who To Be Champion

चॅम्पियन्स ट्रॉफी: आज ठरेल चॅम्पियन्सचा चॅम्पियन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्मिंगहॅम - वर्ल्डकप 2011 ची विजेता टीम इंडिया आणि यजमान इंग्लंड यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेटचा सातवा आणि अखेरचा फायनल रविवारी पार पडेल. दोन्ही संघ शानदार कामगिरी करून फायनलमध्ये पोहोचले आहेत. आता ‘सुपर संडे’ कोणाच्या नावे होतो, हे बघावे लागेल.


धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकले होते. सोबतच धोनी कर्णधार असताना टीम इंडिया कसोटी आणि वनडे क्रमवारित नंबर वनच्या सिंहासनावर पोहोचली होती. आता टीम इंडियाकडे अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावून नवा इतिहास घडवण्याची संधी आहे.
इंडियाने तिस-यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी भारताने 2002-03 मध्ये श्रीलंकेसोबत संयुक्त विजेतेपद पटकावले होते. तर 2000-01 मध्ये फायनल लढतीत न्यूझीलंडने भारताला पराभूत केले होते. त्या वेळी टीम इंडिया उपविजेता ठरली.


सध्यातरी या स्पर्धेत टीम इंडियाचे अभियान अजेय ठरले आहे. भारताने सराव सामन्यांत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांना हरवले. नंतर साखळीत भारताने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानला मात दिली. सेमीफायनलमध्ये धोनी ब्रिगेडने श्रीलंकेला 8 विकेटने पराभूत करून फायनलमध्ये थाटात प्रवेश केला.


मिळालेल्या संधीचा लाभ उचलण्यासाठी सज्ज : जोनाथन ट्रॉट
इंग्लंड टीम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आमच्या संघाने स्वत:ला सिद्ध करून फायनलमध्ये धडक दिली आहे. आता येथे पोहोचून विजेतेपद मिळवून या संधीचा लाभ उचलण्यास सर्व खेळाडू सज्ज आहेत, असे इंग्लंडचा मधल्या फळीचा फलंदाज जोनाथन ट्रॉटने म्हटले. फायनलमध्ये खेळण्यासाठी आम्ही सारे खेळाडू आतुर आहोत. इंग्लंड संघाकडून आघाडीच्या फळीत खेळणे सोपे काम नाही. आता या संधीचे सोने करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही तो म्हणाला. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून आम्ही आमच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिल्याचेही या वेळी त्याने म्हटले. भारतीय संघ मजबूत आहे. भारताने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आम्ही त्यांना सहज घेऊ शकत नाही, असेही तो म्हणाला.


टीम इंडियाची मजबूत बाजू
दमदार सलामीवीर : दोन्ही सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात आहेत. स्पर्धेत दोघांनी आतापर्यंत दोन शतकी आणि दोन अर्धशतकी भागीदा-या केल्या आहेत. शिखर धवनने दोन शतके आणि दोन अर्धशतके, तर रोहित शर्माने दोन अर्धशतके झळकावली आहेत.
चार सामने जिंकले : टीम इंडियाने दमदार प्रदर्शन करून स्पर्धेत आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारताची कामगिरी दर्जेदार ठरत आहे.
मधली फळी भक्कम : मधल्या फळीत युवा फलंदाज विराट कोहली, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा कोणत्याही परिस्थितीत संघाचा डाव सावरू शकतात. कोहली आणि कार्तिक यांनी प्रत्येकी एक शतक काढले आहे.
गोलंदाजी भरवशाची : भुवनेश्वरकुमार, ईशांत शर्मा आणि लेगस्पिनर रवींद्र जडेजा व ऑफस्पिनर आर. अश्विन चांगली कामगिरी करीत आहेत. जडेजाने आतापर्यंत चार सामन्यांत 10 बळी घेतले आहेत. जडेजाला वेस्ट इंडीजविरुद्ध, भुवनेश्वरला पाकविरुद्ध, तर ईशांत शर्माला श्रीलंकेविरुद्ध प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.
सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षण : स्पर्धेत भारताचे क्षेत्ररक्षण सर्वश्रेष्ठ ठरले आहे. स्वत: कर्णधार धोनी यामुळे उत्साहित असून, सध्या भारताचे क्षेत्ररक्षण जगात सर्वोत्तम असल्याचे त्याचे मत आहे.


इंग्लंडची मजबूत बाजू
इंग्लंडच्या फलंदाजीत अ‍ॅलेस्टर कुकशिवाय इयान बेल, जोनाथन ट्रॉट, जो. रूट, इयान मोर्गन, जोस बटलर आणि रवी
बोपारासारखे उत्तम दर्जाचे फलंदाज आहेत. इंग्लंडकडे गोलंदाजीची मदार स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन, टीम ब्रेसनन, ट्रेडवेल यांच्यावर असेल. याशिवाय ऑफस्पिनर ग्रीम स्वानही असेल.


इंग्लंडची दुबळी बाजू
इयान मोर्गन, जोस बटलर आणि रवी बोपाराची बॅट शांत आहे. या तिघांना अद्याप अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. तळाच्या फलंदाजांनाही अडचणीच्या वेळी धावा काढता आल्या नाही. आघाडीची फळी कोसळल्यास इंग्लंडचा डाव सहज कोलमाडू शकतो, अशी स्थिती आहे.


इंग्लंडचा प्रवास
इंग्लंड वि.वि. ऑस्ट्रेलिया, 48 धावा
इंग्लंड पराभूत विरुद्ध श्रीलंका, 7 विकेट
इंग्लंड वि.वि. न्यूझीलंड, 10 धावांनी
सेमीफायनल : इंग्लंड वि. वि. द. आफ्रिका, 7 विकेट.


भारताची कामगिरी
भारत वि.वि. दक्षिण आफ्रिका, 26 धावांनी
भारत वि.वि. वेस्ट इंडीज, 8 विकेट
भारत वि.वि. पाकिस्तान, 8 विकेट
सेमीफायनल : भारत वि.वि. श्रीलंका, 8 विकेट
० दोन्ही संघांची आत्तापर्यंतची कामगिरी पाहता भारताचे पारडे जड दिसत आहे.
भारत-इंग्लंड : वनडेतील आकडेवारी
सामने एकूण भारतात इंग्लंडमध्ये इतर ठिकाणी
सामने खेळले 86 33 45 08
इंग्लंड विजयी 35 18 15 02
भारत विजयी 46 11 29 06
टाय 02 01 01 00
अनिर्णीत 03 03 0 0


संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, भुवनेश्वरकुमार, ईशांत शर्मा, उमेश यादव, इरफान पठाण.
इंग्लंड : अ‍ॅलेस्टर कुक (कर्णधार), इयान बेल, जोनाथन ट्रॉट, जो. रूट, इयान मोर्गन, जोस बटलर, रवी बोपारा, टीम ब्रेसनन, स्टुअर्ट ब्रॉड, ट्रेडवेल, ग्रीम स्वान, जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्ट्रो.