पॅरिस - बार्सिलोना संघाने गुरुवारी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. या संघाने रंगतदार लढतीत अजेक्सला २-० अशा फरकाने पराभूत केले. स्टार खेळाडू लियोनेल मेसीने (३६, ७६ मि.) केलेल्या गोलच्या बळावर बार्सिलोनाने रोमहर्षक विजयाची नोंद केली.
सामन्याच्या मध्यंतरापूर्वी बार्सिलोनाने १-० ने आघाडी मिळवली. मेसीने ३६ व्या मिनिटाला संघाकडून गोलचे खाते उघडले. दरम्यान, अजेक्सने लढतीत बरोबरी साधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, बार्सिलोनाच्या गोलरक्षकाने प्रतिस्पर्धी टीमचे प्रयत्न हाणून पाडले. दुस-या हाफमध्येही मेसीने सामन्यातील
आपला दबदबा कायम ठेवला. त्याने ७६ व्या मिनिटाला वैयक्तिक आणि संघाकडून दुस-या गोलची नोंद केली. यासह त्याने संघाचा विजय निश्चित केला.
मेसीकडून विक्रमाची बराेबरी
लियोनेल मेसीने लीगमधील सर्वाधिक गोलच्या विक्रमाची बरोबरी साधली. त्याने रिअल माद्रिदचे माजी खेळाडू राऊल यांच्या लीगमध्ये सर्वाधिक ७१ गोलची बराबेरी साधली. मेसीने ९० सामन्यांत ७१ गोल केले. राऊल यांनी १४२ सामन्यांतून हा विक्रम नोंदवला होता. तसेच रोनाल्डोच्या नावे १०७ सामन्यांत ७० गोलची नोंद होती.