आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स लीग: चेन्नईची विजयी हॅट्ट्रिक, ब्रिस्बेनवर 8 गड्यांनी मात करून सेमीफायनलमध्ये धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (नाबाद 13) नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्ज संघाने शनिवारी चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक केली. या संघाने लीगच्या तिसर्‍या सामन्यात ब्रिस्बेनवर 8 गड्यांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने लीगच्या उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. चेन्नईचे ब गटात 12 गुण झाले आहेत.

प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेनने 7 बाद 137 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने 15.5 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. नाबाद अर्धशतक ठोकणारा सामनावीर माईक हसी (57) चेन्नईच्या विजयाचा हीरो ठरला.

धावांचा पाठलाग करणार्‍या चेन्नईकडून माइक हसी आणि मुरली विजयने दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 75 धावांची भागीदारी करून केली. दरम्यान, कटिंगने ही जोडी फोडली. त्याने मुरलीला बुर्नकरवी झेलबाद केले. मुरलीने 27 चेंडंूत पाच चौकार व दोन षटकारांसह 42 धावा काढल्या. हसीने 48 चेंडूंत सात चौकारांसह नाबाद 57 धावा काढल्या.

मोहित, जडेजाचे दोन बळी
धोनीच प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय मोहित शर्माने सार्थकी लावला. त्याने पहिल्या षटकात मिचेलला (0) बाद केले. त्यानंतर मोर्कलने होप्सला (20) झेलबाद केले. दरम्यान, लियोनने 29 धावा काढल्या. त्यानंतर कटिंग (नाबाद 42) आणि हार्टलेने (35) सातव्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक - ब्रिस्बेन : 7 बाद 137, चेन्नई सुपरकिंग्ज : 2 बाद 140.

विजयी हॅट्ट्रिकसाठी राजस्थान सज्ज!
जयपूर २ चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी हॅट्ट्रिकसाठी राहुल द्रविडचा राजस्थान रॉयल्स संघ सज्ज झाला आहे. राजस्थान व पर्थ स्कॉचर्स यांच्यात रविवारी सामना होणार आहे. या सामन्यातील विजयासह लीगची उपांत्य फेरी गाठण्याचा राजस्थान रॉयल्सचा प्रयत्न असेल. सलग दोन विजयांनी राजस्थानचे गुणतालिकेत आठ गुण आहेत.

टायटन्स संघाकडून हैदराबाद पराभूत
रांची- दक्षिण आफ्रिकेच्या टायटन्स संघाने शनिवारी सहज विजय मिळवून चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाची आशा कायम ठेवली. या संघाने शिखर धवनच्या सनरायझर्स हैदराबादला 8 गड्यांनी पराभूत केले. डेव्हिड वीसच्या (3/17) घातक गोलंदाजीपाठोपाठ रुडॉल्फ (नाबाद 49) आणि कर्णधार हेन्री डेव्हिड्स (64) यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर टायटन्सने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्सने 7 बाद 145 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात टायटन्सने 16.3 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा हा तीन सामन्यांत दुसरा विजय ठरला. या विजयासह टायटन्सचे आठ गुण झाले आहेत. दुसरीकडे हैदराबादचा तीन सामन्यात दुसरा पराभव ठरला. या पराभवामुळे हैदराबादचे लीगच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाचे स्वप्न भंगले. सनरायझर्सने फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजीतही निराशाजनक कामगिरी केली.