आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स लीग टी-20: सनरायझर्सचा सामना आज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - चॅम्पियन्स लीग टी-20 मध्ये शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा पहिला सामना मंगळवारी मोहाली येथे ब गटात त्रिनिदाद अँड टोबॅगोविरुद्ध होईल. सनरायझर्सने क्वालिफायरचे दोन सामने जिंकून मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. हा सामना रात्री 8.00 वाजता होईल.
सनरायझर्सकडे शिखर धवनशिवाय जे. पी. डुमिनी, पार्थिव पटेल, कॅमरून व्हाईट आणि हनुमान विहारीसारखे दिग्गज फलंदाज आहेत. हैदराबादची गोलंदाजी मजबूत आहे. हीच त्यांची उजवी बाजू आहे. गोलंदाजीत हैदराबादकडे डेल स्टेन, इशांत शर्मा, थिसारा परेरा, अमित मिश्रा आणि डॅरेन सॅमीसारखे गोलंदाज आहेत. सॅमी, मिश्रा आणि परेरा गोलंदाजीसह फलंदाजीतही उपयोगी ठरू शकतात.


त्रिनिदादही आहे मजबूत
दुसरीकडे ब्रिस्बेन हिटला पराभूत केल्यानंतर त्रिनिदाद अँड टोबॅगो संघाचा आत्मविश्वास बुलंदीवर आहे. या सामन्यात कॅरेबियन संघाला फक्त 135 धावा काढता आल्या होत्या. मात्र, त्यांच्या गोलंदाजांनी शानदार बचाव करताना संघाला विजयश्री मिळवून दिली. रवी रामपॉलने 14 धावांत 4 विकेट, तर सुनील नरेन आणि राड एमरिटनेसुद्धा उत्कृष्ट शानदार गोलंदाजी केली. दिनेश रामदिनने कर्णधारपदाची खेळी करताना शानदार फलंदाजी केली. त्याने मागच्या सामन्यात 48 धावा काढल्या होत्या.


दोन दुबळ्यांत मजबूत कोण?
० ब गटात टायटन्स आणि ब्रिस्बेन हिट यांच्यात मंगळवारी दुपारी 4.00 वाजता सामना होईल. या दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला होता. पराभूत झालेल्या दोन दुबळ्या संघांत मजबूत कोण, हे स्पष्ट होईल.
० टायटन्सला स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जकडून पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे ब्रिस्बेन हिटला त्रिनिदाद अँड टोबॅगोने 25 धावांनी नमवले होते. टायटन्सचा संघ अधिक उजवा दिसतो.


दोन्ही संघांकडे स्टार खेळाडू
टायटन्सच्या संघाकडे एल्बी डिव्हिलर्स, हेन्री डेव्हिड्स, जॅक रुडॉल्फ आणि फरहान बेहरादिनसारखे उपयुक्त खेळाडू आहेत. गोलंदाजीत त्यांच्याकडे मोर्ने मोर्केल, रेयान वॅन डर मर्व, एम. डी. लांगेसारखे अनुभवी खेळाडू आहेत. दुसरीकडे ब्रिस्बेन हिटकडे जो. बर्न्स, जेम्स होप्स, डॅनियल क्रिस्टियन, पीटर फॉरेस्टसारखे फलंदाज आणि अ‍ॅलेस्टर मॅकडरमॉट, नॅथन हॅरित्झसारखे गोलंदाज आहेत.


पावसामुळे दोन्ही सामने रद्द
चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी अ गटात पर्थ स्कॉचर्स वि. हायवेल्ड लॉयन्स तसेच मुंबई इंडियन्स वि. ओटागो यांच्यात सामने रंगणार होते. मात्र, स्पर्धेतील या दोन्ही सामन्यांवर वरुणराजाची वक्र दृष्टी पडली. एकही चेंडूचा खेळ न होता, या लढती रद्द करण्यात आल्या. पर्थ स्कॉचर्स आणि हायवेल्ड लॉयन्स यांच्यात किमान नाणेफेक तरी झाली. मात्र, आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि ओटागो यांच्यातील सामन्याला टॉसची सुद्धा संधी मिळू शकली नाही. सामना रद्द झाल्यामुळे चारही संघांना प्रत्येकी दोन गुण देण्यात आले. जोरदार पावसामुळे मैदानावर सर्वत्र पाणी साचले होते.