आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स लीग टी-20: टायटन्सचा रोमांचक विजय!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहाली - क्रिकेटच्या मैदानावर कधी-कधी छोटेसे लक्ष्यसुद्धा ‘भले मोठे’ ठरते. मंगळवारी चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पध्रेत मोहाली येथील लढतीत ब्रिस्बेन हिट संघासोबत असेच घडले. अवघ्या 124 धावांचा पाठलाग करणार्‍या ब्रिस्बेनचा रोमांचक सामन्यात 4 धावांनी निसटता पराभव झाला.

टायटन्सचे गोलंदाज मोर्ने मोर्केल आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या मर्चेंट डी लेंगे यांनी 145 किमी वेगाने आग ओकणारी गोलंदाजी केली. या दोघांसमोर ब्रिस्बेनच्या फलंदाजांना अवघ्या 124 धावांचे लक्ष्यही गाठता आले नाही. अखेरच्या षटकात ब्रिस्बेनला विजयासाठी 10 धावांची गरज होती. त्यांच्या हाती त्या वेळी तीन विकेट शिल्लक होत्या. मात्र, अखेरच्या षटकातील पहिल्या आणि दुसर्‍या चेंडूवर सलग दोन गडी धावबाद झाल्यानंतर त्यांच्या विजयाच्या आशा कमी झाल्या. सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या लेंगेने 4 षटकांत 17 धावांच्या मोबदल्यात 3 गडी तर रिचर्ड्सने 2 गडी बाद केले. लेंगेने डावात सर्वाधिक ताशी 147 किमी वेगाने चेंडू टाकून ब्रिस्बेनच्या फलंदाजांना त्रस्त केले. ब्रिस्बेनकडून जेम्स होप्सने सर्वाधिक 37 धावा काढल्या. अवघ्या 124 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रिस्बेनची टीम 3 बाद 24 धावा अशी संकटात सापडली. जेम्स होप्सने दुसर्‍या टोकाने संघर्ष केला.
संक्षिप्त धावफलक
टायटन्स : 123 (डेव्हिड 39, हेनी कुन 31, 4/10 गल, 2/16 क्रिस्टियन), वि.वि. ब्रिस्बेन : 119. (जेम्स होप्स 37, क्रिस्टियन 21, 3/13 लेंगे, 2/20 रिचर्ड्स).

हेन्री डेव्हिड चमकला
तत्पूर्वी, ब्रिस्बेन हिटने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मॅथ्यू गलने हा निर्णय योग्य ठरवला. त्याच्या धारदार गोलंदाजीपुढे टायटन्सचा खेळ 18.5 षटकांत अवघ्या 123 धावांत आटोपला. मध्यमगती गोलंदाज गलने 2.5 षटकांत अवघ्या 10 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. एक वेळ टायटन्सची टीम 15 षटकांत 4 बाद 109 अशा सुस्थितीत होती. मात्र, पुढच्या तीन षटकांत त्यांचे 6 गडी अवघ्या 14 धावा काढून बाद झाले. त्यांच्याकडून कर्णधार हेन्री डेव्हिडने सर्वाधिक 39 आणि हेनी कुनने 31 धावांचे योगदान दिले. एल्बी डिव्हिलर्सने 28 धावा काढल्या. डेव्हिड आणि हनी यांनी दुसर्‍या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. या दोघांमुळे संघाला सन्मानजनक धावा काढता आल्या.