भुवनेश्वर - वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघाने गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने शानदार विजयासह स्पर्धेतील
आपला दबदबा कायम ठेवला. या संघाने उपांत्यपूर्व सामन्यात वर्ल्डकपमधील कांस्यपदक विजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारली. ऑस्ट्रेलियाने ४-२ अशा फरकाने सामना जिंकला.
सायमन ओचार्ड (६ मि.), हायवर्ड (३७ मि.), बेलेई (४२ मि.) आणि ख्रिस सिरिल्लाे (४९ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. यासह गत चॅम्पियन संघाने अंतिम चारमधील आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे पराभवामुळे अर्जेंटिना संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. अर्जेंटिनासाठी पारेडेस (१६ मि.) आणि ब्रुनेट (३५ मि.) यांनी गोल केले. मात्र, त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही.
गतविजेत्या संघाने दमदार सुरुवात करताना सहाव्या िमनिटाला १-० ने आघाडी घेतली.
हॉलंडविरुद्ध पाकचा १६ वर्षांनी विजय
पराभवातून सावरलेल्या पाकिस्तानने सनसनाटी विजय मिळवला. या संघाने १६ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हॉलंडवर मात केली. पाकने ४-२ ने सामना जिंकून अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. पराभवामुळे ऑलिम्पिक स्पर्धेतील राैप्यपदक विजेत्या हॉलंडचे आव्हान संपुष्टात आले. असद रझा (१५ मि.), इम्रान इनाम (३० मि.), इरफान (५१, ५२ मि.) यांनी गाेल करून पाकला विजय मिळवून दिला.