आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफी: इंग्लंडचा आफ्रिकेवर 7 गड्यांनी शाही विजय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ऑफस्पिनर जेस ट्रेडवेल (19 धावांत 3 विकेट), स्टुअर्ट ब्रॉड (50 धावांत 3 विकेट) आणि जोनाथन ट्रॉट (नाबाद 82) या तिघांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर 7 गड्यांनी मात केली. या विजयासह इंग्लंडने 9 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये भारत किंवा श्रीलंका यांच्यापैकी एकाशी इंग्लंडचा सामना 23 जून रोजी होईल.


इंग्लंडने द. आफ्रिकेला 38.4 षटकांत अवघ्या 175 धावांत गुंडाळले. यानंतर 37.3 षटकांत 3 बाद 179 धावा काढून सहज विजय मिळवला. ट्रॉटने 84 चेंडूंत 11 चौकारांसह नाबाद 82 धावा काढून मॅच विजेता खेळी केली.


पुन्हा चोकर्स ठरले
1998-99 मध्ये पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी दक्षिण आफ्रिकेची टीम पुन्हा एकदा चोकर्स ठरली आहे. त्यांच्यावर बसलेला हा शिक्का ते पुसू शकले नाहीत. मोठ्या स्पर्धेत निर्णायक क्षणी डगमगण्याचा शिक्का आफ्रिकेवर आहे. या वेळी पुन्हा आफ्रिकन फलंदाज आणि गोलंदाजांनी हे सिद्ध केले.


छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने कुक (6) आणि इयान बेल (20) यांच्या विकेट लवकर गमावल्या. मात्र, शानदार फॉर्मात असलेल्या ट्रॉटने जो. रुटसोबत (48) तिस-या विकेटसाठी 21 षटकांत 105 धावांची विजयी भागीदारी केली. ट्रॉटने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले.


लाजिरवाणी कामगिरी
तत्पूर्वी मधल्या फळीचा फलंदाज डेव्हिड मिलर (नाबाद 56) आणि तळाचा फलंदाज आर. क्लिनवेल्ट (43) यांच्याशिवाय इतर फलंदाजांना धावा काढण्यात अपयश आले. रॉबिन पीटरसनने 30 आणि फॉप डुप्लेसिसने 26 धावांचे योगदान दिले. रॉबिन पीटरसन आणि डुप्लेसिस यांनी तिस-या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली. कर्णधार एल्बी डिव्हिलर्सला तर भोपळासुद्धा फोडता आला नाही. 9 चेंडूंचा सामना केल्यानंतर ब्रॉडने त्याला शून्यावरच तंबूचा रस्ता दाखवला.


संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका : 175 (डेव्हिड मिलर 56, क्लिनवेल्ट 43, 3/19 ट्रेडवेल, 3/50 ब्रॉड).
इंग्लंड : 3/179 (ट्रॉट नाबाद 82).


मिलर-क्लिनवेल्टची भागीदारी
आठ गडी बाद झाल्यानंतर आफ्रिकेची टीम शंभरीसुद्धा ओलांडेल की नाही, असे वाटत होते. मात्र, मिलरने हार न मानता तळाचा फलंदाज क्लिनवेल्टसोबत खिंड लढवली. दोघांनी नवव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करून संघाला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला. क्लिनवेल्टने 61 चेंडूंत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 43 धावा काढल्या. मिलरने 51 चेंडूंत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 56 धावा जमवल्या. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स ट्रेडवेल यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. जेम्स अँडरसनने दोघांना टिपले.