आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांच्या नियमावलीत बदल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ऑलिम्पिक व तत्सम इतर जागतिक क्रीडा स्पर्धेतील सहभागी आणि आशियाई व कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूला यापुढे थेट शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिला जाणार आहे. वजनी खेळाडूंसाठी या पुरस्कारासाठीची किमान सव्वाशे गुणांची अट कमी करून आता 90 करण्यात आली आहे.
राज्यातील उत्कृष्ट क्रीडापटू, मार्गदर्शक व क्रीडा संघटकांना गौरवण्यासाठी सरकारच्या वतीने गेल्या चाळीस वर्षांपासून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठीची नियमावली शासनाने बदलली आहे. सुधारित नियमावलीत हे बदल करण्यात आले आहेत.

राज्याचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले, ‘‘सुधारित नियमावलीमध्ये पूर्वीचा कोणताही क्रीडा प्रकार वगळलेला नाही. तसेच कोणत्याही क्रीडा प्रकारासाठीचे पुरस्कार कमी करण्यात आलेले नाहीत.’’ वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात किमान सव्वाशे किंवा अधिक गुण प्राप्त करणा-या प्रत्येकी एक पुरुष व महिलेला उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात येईल. मात्र वजनगट असलेल्या वैयक्तिक खेळांसाठी किमान गुणांची अट 90 असेल. वजनीगट आवश्यक असलेल्या क्रीडा स्पर्धांची संख्या कमी असल्याने हा निर्णय घेतला, असे सोपल म्हणाले.

‘उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक’ हा एक लाख रुपयांचा पुरस्कार दरवर्षी जास्तीत जास्त तिघांना दिला जाईल. अपंग-मूकबधिर खेळाडूंच्या मार्गदर्शकांसाठी एक जादा विशेष पुरस्कार ठेवण्यात आला आहे. उत्कृष्ट संघटकासाठीचे जास्तीत जास्त आठ पुरस्कार दिले जातील. ते विभागनिहाय असतील.

निवड समितीतून ‘पुढा-यां’ना डच्चू
पुरस्कारांसाठीच्या निवड समितीत क्रीडामंत्री व राज्यमंत्र्यांसह 2 शासकीय सदस्य असतील. याव्यतिरिक्तच्या इतर 5 अशासकीय सदस्यांमध्ये क्रीडा क्षेत्रातील पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री तसेच राजीव गांधी खेलरत्न व द्रोणाचार्य पुरस्कारार्थी खेळाडूंनाच घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा बदल झाला आहे. यामुळे शासकीय पुरस्कारांमधील वशिलेबाजीला आळा बसण्याची अपेक्षा आहे.