आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cheteshwar Pujara Helps In India A Win Over Windies A

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेतेश्‍वर पुजाराची अफलातून खेळी, भारत 'अ' विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिजटाऊन: सामनावीर ठरलेला कर्णधार चेतेश्वर पुजारा (नाबाद 96) च्या दमदार खेळीच्या बळावर भारत 'अ' संघाने वेस्ट इंडीज 'अ' संघाला पहिल्या प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 2 विकेटने हरवले. या विजयासह भारत 'अ' संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 9 जून रोजी किंगस्टन येथे होईल.
186 धावांचा पाठलाग करताना भारताने आपल्या 5 विकेट अवघ्या 68 धावांत गमावल्या होत्या. यानंतर 115 च्या स्कोअरवर 8 खेळाडू तंबूत परतल्यानंतर भारत पराभवाच्या उंबरठ्यावर उभा होता. मात्र, कसोटी संघाचा दावेदार असलेल्या चेतेश्वर पुजाराने एका टोकाने झुंजार खेळ करताना शमी अहेमद (नाबाद 27) सोबत नवव्या विकेटसाठी 73 धावांची अभेद्य भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला. भारताने 8 विकेट गमावून 188 धावा काढत रोमांचक विजय मिळवला. पहिल्या डावात 50 धावा काढणा-या पुजाराने दुस-या डावात संयमी खेळी करताना 222 चेंडूंचा सामना करीत 10 चौकार मारले.
भारताने कालच्या 3 बाद 22 धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. पुजाराने रोहित शर्मा (23) सोबत चौथ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली.
पुजाराला मिळाली शमीची मदत
रोहितनंतर भारताचे दोन दिग्गज खेळाडू मनोज तिवारी (5) आणि वृद्धिमान साहा (3) लवकर बाद झाल्यानंतर भारतीय अ संघाचा पराभव निश्चित मानला जात होता. अशा संकटाच्या प्रसंगी शमी अहेमदने नाबाद 27 धावा काढल्या आणि भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.
पुजाराने मारला विजयी चौकार
भारताला विजयासाठी अवघ्या 20 धावांची गरज असताना पुजाराने चौकार मारून दबाव कमी केला. थोड्या वेळाने आणखी एक चौकार मारून त्याने भारताचा विजय निश्चित केला. वेस्ट इंडीजकडून होल्डरने 55 धावांत 5 गडी बाद केले, तर जॉन्सनने 62 धावांत 2 विकेट घेतल्या.
कोण आहे हा शमी अहेमद ?
22 वर्षीय शमी अहेमदने सामन्यात एकूण 5 गडी बाद केले आणि नाबाद 27 धावा काढून चांगली फलंदाजीही केली. त्याच्या खेळीने भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. तो उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून आयपीएल-5 मध्ये विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सचा सदस्य होता. आयपीएलमध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.