आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Champion Lee Nane News In Marathi, Divya Marathi

8 व्या वर्षी चीनमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू,समोर आव्हानांचा डोंगर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच वर्षांची असतानाच ली नाने वडिलांना बॅडमिंटन खेळताना पाहून याच क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 8 वर्षे पूर्ण होण्याच्या आतच तिने बॅडमिंटन सोडले आणि टेनिसची रॅकेट हातात घेतली. वुहान यूथ टेनिसचे प्रशिक्षक जिया जियाओ यांनी टेनिसमध्येच लीचे उज्‍जवल भविष्य आहे, असे सांगितल्यानंतर पालकांनीही हा बदल स्वीकारला. त्या वेळी आई-वडिलांसाठी ‘टेनिस’ हा शब्दच नवा होता. या खेळाला ते ‘फज बॉल’ म्हणत असत. लीचे वडील सांगतात, ‘1997 मध्ये ली राष्ट्रीय टेनिस टीममध्ये सहभागी झाली आणि काही महिन्यांतच तिचे आयुष्य बदलले. आठवड्यातील एका रात्रीच ती घरी असायची. तिला कधीही सुटी नसायची. लीच्या अभ्यासाची चिंता वाटत होती. शाळेतील व्यवस्थापनाशी बोलून मंगळवार आणि गुरुवारी सकाळचा वेळ अभ्यासासाठी काढला.’ उर्वरित वेळेत ली टेनिसचे प्रशिक्षण घेत होती. शाळेत फारच मोठे लाकडी रॅकेट होते. त्यामुळे सराव करताना तिच्या हाताची त्वचा सोलून निघायची. नवव्या वर्षी लिक्युआओ तिचे प्रशिक्षक बनले. ते नेहमीच तिला रागावत असत. आक्षेपार्ह बोलत असत. टीममध्ये आल्यानंतर नाइकीने ली नाला प्रायोजकत्व दिले आणि ती टेक्सासमधील जॉन न्यूकोम्ब अकॅडमीत टेनिस शिकवण्यासाठी गेली. 10 महिने तेथे राहिल्यानंतर ती चीनमध्ये परतली.
14व्या वर्षी सदर्न चायना टुर्नामेंट सुरू असताना तिच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. तिच्या खेळावर परिणाम होऊ नये, म्हणून प्रशिक्षकांनी तिला वडिलांच्या मृत्यूची बातमी अनेक दिवस सांगितलीच नाही. 1999 मध्ये म्हणजेच 16व्या वर्षी ती व्यावसायिक स्पर्धा खेळू लागली. दोन वर्षांच्या अखंड मेहनतीनंतर वयाच्या 18 व्या वर्षी ती चीनमधील क्रमांक 1ची खेळाडू बनली. 2001 मध्ये हुबई राष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा ध्यास घेतल्यामुळे वर्षभर ती जियाँग शान यांच्यापासून दूर राहिली. शान सध्या तिचे पती आहेत. ते सांगतात, ‘सकारात्मक विचारांमुळेच ली इथवर पोहोचली आहे.’ मधल्या काळात तिच्या हार्मोन्समधील संतुलन बिघडले. त्यामुळे तिला हार्मोन इंजेक्शन्स घ्यावे लागत होते. त्याची अँलर्जीही होऊ लागली. टेनिससाठी आपले आरोग्य आणि इतर आनंदाची बाजी लावणार नाही, हे तिने 20 व्या वर्षीच ठरवले होते. चीनमधील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीपासून दूर ठेवले जाते. ली मात्र वेगळी होती. ती इंग्रजीत बोलते. फक्त चीनला गौरव मिळवून देण्यासाठी यंत्रमानवाप्रमाणे खेळत नाही. कोणत्याही देशात गेल्यावर ती तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि मोठी आव्हाने स्वीकारण्यासाठी मार्गदर्शन करते. नुकत्याच एका टुर्नामेंटमध्ये तिने परिधान केलेल्या एका टी-शर्टवर ‘डेअर टू एम हायर दॅन स्काय’ (आकाशापेक्षाही उंचावरील स्वप्न पाहा) असे वाक्य लिहिले होते.

32 व्या वर्षी खेळाडू निवृत्तीची तयारी करतात, मात्र याच वयातील ही टेनिसपटू तिच्या आयुष्यातील सवरेत्कृष्ट कामगिरी करत आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात तिने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले व दुसरे ग्रँड स्लॅम स्वत:च्या नावावर केले. 2011 मध्ये तिने पहिले फ्रेंच ओपन जिंकले होते. एकेरी ग्रँड स्लॅम जिंकणारी ती पहिली आशियाई खेळाडू ठरली. मारिया शारापोवानंतर ती जगातील दुसर्‍या क्रमांकावरील सर्वाधिक मानधन कमावणारी खेळाडू आहे. तिची संपत्ती 40 दशलक्ष डॉलर आहे. तिने आजपर्यंत एकूण 9 महिला एकेरी टेनिस असोसिएशन स्पर्धा जिंकल्या आहेत. फेब्रुवारी 2014 मध्ये जगातील दुसर्‍या क्रमांकावरील खेळाडू म्हणून तिची घोषणा करण्यात आली. सोशल मीडियात तिचे 22.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
ली ना : जगातील दुसर्‍या क्रमांकाची टेनिसपटू
चर्चेत का? : फ्रान्सच्या क्रिस्टिनाने तिला हरवून फ्रेंच ओपनमध्ये पहिल्या फेरीतच बाहेर केले. क्रिस्टिना सध्या जगात 103 व्या स्थानावर.