आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस चीनच्या 'ली ना'ने विजेतेपद पटकावलेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - अखेर चीनच्या ली नाने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलेच. शनिवारी महिला एकेरीच्या फायनलमध्ये तिने स्लोवाकियाच्या डॉमिनिका सिबुकोवाला नमवले. मागच्या चार वर्षांत ली नाने तिस-यादा फायनलमध्ये प्रवेश केला होता. मागच्या वर्षी फायनलमध्ये बेलारुसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाकडून ली नाचा पराभव झाला. तर 2011 मध्ये किम क्लिजस्टर्सने तिला फायनलमध्ये मात दिली. 2012 मध्ये क्लिजस्टर्सनेच तिला चौथ्या फेरीत पराभूत करून स्पर्धेबाहेर केले होते. यावेळी तिने हार मानली नाही..अखेर ली ना जिंकलीच..! यापूर्वी 2011 मध्ये तिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
ली नाने सरळ दोन सेटमध्ये 7-6, 6-0 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. चीनच्या खेळाडूने 97 मिनिटांत महिला एकेरीचे अंजिक्यपद आपल्या नावे केले. ली नाला सिबुलकोवाविरुद्ध पहिल्या सेटमध्ये 70 मिनिटे झुंज द्यावी लागली. मात्र, टायब्रेकरपर्यंत रंगलेला पहिला सेट तिने आपल्या नावे केला. त्यानंतर दुस-या सेटमध्ये चीनच्या खेळाडूने आपला दबदबा निर्माण केला. तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला प्रत्युत्तराची एकही संधी मिळू दिली नाही. यासह तिने दुस-या सेटमध्ये एकतर्फी विजय मिळवला.
मार्गारेट कोर्टचा विक्रम मोडला
चीनच्या ली नाने विजेतेपदासह मार्गारेट कोर्टच्या नावे असलेला विक्रमही मोडला. ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब जिंकणारी 31 वर्षीय ली ना ही सर्वात वयस्कर महिला खेळाडू ठरली. यापूर्वी, कोर्टने 1973 मध्ये वयाच्या 30 व्या वर्षी हा विक्रम नोंदवला होता.