आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माद्रिदचा रावडी रोनाल्डो ! बिल्बोविरुद्ध पुन्हा हॅट्ट्रीक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो सध्या भन्नाट फॉर्मात आहे. गत पाच सामन्यांतील आपल्या नितांत सुंदर खेळाच्या जादूने त्याने अवघ्या फुटबॉलविश्वालाच मोहवून टाकले आहे. ला लीगमध्ये अ‍ॅथलेटिक बिल्बोविरुद्ध रोनाल्डोने हॅट्ट्रीकचा भीमपराक्रम नोंदवला. त्याच्या जोडीला करीम बेन्झेमने दोन गोल केल्यामुळे माद्रिदने ५-० ने विजयाला गवसणी घातली. गेल्या पाच सामन्यांतील ही रोनाल्डोची तिसरी हॅट्ट्रीक ठरली. या विजयासह माद्रिदने टॉप चारमध्ये जागा पटकावली.

रोनाल्डोने दुस-या, ५५ व्या आणि ८८ व्या मिनिटाला गोल केले, तर बेन्झेमाने ४१ आणि ६९ व्या मिनिटाला ही कामगिरी केली. लुडोगारेट्स रझगार्डविरुद्ध २-१ ने विजय मिळवल्यानंतर प्रशिक्षक कार्लो अ‍ॅनसेलोट्टी यांनी या सामन्यात काही स्टार खेळाडूंना विश्रांती दिली होती. तरीही माद्रिदनेच सत्ता गाजवली. दुस-याच मिनिटाला रोनाल्डोने केलेला गोल माद्रिदमध्ये ठासून भरलेल्या आत्मविश्वासाचेच प्रतीक होता.

बॅलेने दिलेल्या पासवर रोनाल्डोने हा गोल केला. त्यानंतर बिल्बोच्या गोरकाने माद्रिदला गोलसाठी झुंजवले. मात्र, बॅलेच्याच पासवर या वेळी बेन्झेमाने ४१ व्या मिनिटाला दुसरा गोल करून त्यांना संकटात लोटले. दरम्यान, चांगले पास देणा-या बॅलेने स्वत:च मात्र गोलची संधी दवडली. अन्यथा पहिल्या सत्रातच माद्रिदने ३-० अशी आघाडी घेतली असती.

बिल्बोने सामना वाचवण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. मात्र, हा बचाव रोनाल्डोने सहज भेदला. सामना संपायला २१ मिनिटे शिल्लक असताना त्याने संघाचा चौथा गोल केला. हेडरने हॅट्ट्रीक गोलची नोंद केली. बिल्बोला एकही गोल करता आला नाही. संपूर्ण सामन्यादरम्यान चाहत्यांनी रोनाल्डोचे जोरदार समर्थन केले.
बार्सिलोना अव्वल
या विजयासह रिअल माद्रिदने १५ गुणांसह अव्वल चार संघांत जागा मिळवली. बार्सिलोना पहिल्या, वाल्नेसिया दुस-या, सेव्हिल्ला तिस-या क्रमांकावर असून पराभवामुळे बिल्बो पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. गेल्या पाच सामन्यांतील त्यांचा हा चौथा पराभव ठरला.
रणवीर रोनाल्डो!
गेल्या ११ सामन्यांत रोनाल्डोने १७ गोल केले आहेत. ला लीगमध्ये ही त्याची २२ वी हॅट्ट्रीक. याआधी अलफ्रेडो डी स्टेफानो आणि टेल्मो झर्राने ला लीगमध्ये प्रत्येकी २२ हॅट्ट्रीक नोंदवल्या आहेत. त्यानंतर एडमुंडो सुआरेझ (१९) आणि लियोनल मेसीचा (१९) क्रमांक लागतो.
पुढे पाहा... ला लीगमध्ये या पाच दिग्गजांच्या हॅट्ट्रीक