आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका, पाक, विंडीज प्रकाशझोतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारण दोन आठवडे जगाचे लक्ष रिओ ऑलिम्पिकवर राहील. दर चार वर्षांनी साजरा होणारा हा क्रीडा उत्सव असल्यामुळे तसे ते असणारच. स्पर्धेच्या आयोजनात संपूर्ण जग एका सूत्रात गुंफले जाते. ऑलिम्पिकवर लोकांच्या नजरा असल्या तरी ऑलिम्पिकमधील क्रीडा प्रकार नसतानादेखील क्रिकेट प्रकाशझाेतात आहे.

भारत-वेस्ट इंडीज, इंग्लंड - पाकिस्तान, श्रीलंका - ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड - झिम्बाब्वे या चार मालिकांचा आनंद क्रिकेटप्रेमी घेत आहेत. क्रिकेट मालिकांमध्ये मी प्रामुख्याने तीन संघांची विशेष चर्चा करेन. हे संघ म्हणजे वेस्ट इंडीज, श्रीलंका आणि पाकिस्तान आहेत. या संघांना प्रतिस्पर्धी संघांपेक्षा कमकुवत समण्यात आले होते. विंडीजने भारताविरुद्ध दुसरी कसोटी अनिर्णीत ठेवून, श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकून, तर पाकने इंग्लंडला हरवून क्रिकेट पंडितांना चूक ठरवले आहे. केवळ झिम्बाब्वेविरुद्ध मालिकाच किवींच्या बाजूने एकतर्फी राहिली. विंडीज/ पाक / श्रीलंकेमध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन श्रीलंकेचे राहिले. श्रीलंकेने आपल्याच देशात ऑस्ट्रेलियाला सलग दोन कसोटीत हरवले. ऑस्ट्रेलियाच्या संघाला श्रीलंकेतील उष्णता मानवली नसल्याचे मानले जाते. यासोबत कांगारूंना तेथील फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर यश मिळू शकले नाही. श्रीलंकेचा संघ काही आठवड्यांआधी इंग्लंडकडून सहज पराभूत झाला होता. मात्र, त्यांनी पुन्हा जोरदार पुनरागमन केले. श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज रंगना हेराथ आणि लिरुवान परेरा यांनी कांगारूंचे बळी टिपले. यात अाश्चर्य म्हणजे ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाजीचा प्रशिक्षक मुथैया मुरलीधरन याच्या टिप्सचा त्यांना काहीही उपयोग झाला नाही. ऑस्ट्रेलिया संघ दोन्ही सामन्यांत बॅकफूटवर दिसला. ऑस्ट्रेलियाच्या संघात कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या आदर्श नेतृत्वाचा अभाव, संघात तांत्रिक बाजूची कमतरता व घसरलेले मनोबल दिसून आले.

दुसरे उदाहरण इंग्लंडचे. इंग्लंडमध्ये अॅलेस्टर कुक ब्रिगेडविरुद्ध पाकिस्तानने उत्कृष्ट प्रदर्शन करत ऐतिहासिक लॉर्ड््स कसोटी जिंकली. पाकिस्तानने गोलंदाजी व फलंदाजी दोन्ही आघाड्यांवर चमकदार कामगिरी करत इंग्लंडलाही चकित केले. गेल्या काही वर्षांत इंग्लंड आपल्या देशात चांगले खेळत आहे. मात्र, पाकिस्तानने त्यांना हरवून विजयाची लय तोडली आहे. वेस्ट इंडीजचे म्हणाल तर त्यांनी घरच्या मैदानावर क्लब स्तराच्या खेळाडूंच्या मदतीने भारताविरुद्ध दुसरी कसोटी अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवले. वेस्ट इंडीज संघ किंग्जस्टन कसोटीत ४८ धावांवर ४ बळी गेल्याच्या अवस्थेतून मोठ्या धैर्याने बाहेर पडला व कसोटी अनिर्णीत ठेवली. दोन्ही संघांतील पहिल्या कसोटीकडे पाहिल्यास भारतीय संघ मालिका क्लीन स्वीप करेल असे वाटत होते. विंडीज दुसऱ्या कसोटीत लयीत आलेला पाहून क्रिकेट पंडितांच्या अंदाजालाही चुकीचे ठरवले. दिग्गज गोलंदाजांना खालची फळी उद्ध्‍वस्त करू शकली नाही. इंडीजचे ब्लॅकवूड, डॉवरिच, होल्डर व चेसने उत्कृष्ट खेळीने इंडीजची कसोटीत गमावलेली प्रतिष्ठा परत आणण्याचा प्रयत्न केला. गेल, ड्वेन ब्राव्हो, आंद्रे रसेल व नरेन यासारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत संघ मालिकेत पुनरागमन करत असेल तर युवा ब्रिगेडला श्रेय द्यावेच लागेल. विंडीज संघ नव्याने बांधला जात आहे. आगामी दोन कसोटीतही त्यांनी चांगली कामगिरी बजावली तर त्याचे आश्चर्य वाटायला नको.
अयाज मेमन
ayazmamon80@gmail.com
बातम्या आणखी आहेत...