आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ साई केंद्रातील अात्महत्येची घटना लाजिरवाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय खेळ प्राधिकरणाच्या (साई) केरळस्थित वसतिगृहातील चार ट्रेनी महिला खेळाडूंनी वरिष्ठांच्या कथित छळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात १५ वर्षांच्या अपर्णाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अनेक खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. जीव गमावलेल्या अपर्णाने राष्ट्रीय नौकायनात पदक जिंकले होते. चौघींनीही गेल्या बुधवारी विषारी फळ खाल्ले. अलाप्पुझा केंद्रात त्या वॉटर स्पोर्ट््सचे प्रशिक्षण घेत होत्या. भारतीय क्रीडा इतिहासात ट्रेनिंग सेंटरमध्ये आत्महत्या होण्याची ही पहिलीच घटना आहे. सामनानिश्चिती, डोपिंग हे प्रकार आपल्याला नवे नाहीत. मात्र, खेळात कारकीर्द घडवण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या एका तरुणीला छळापायी जीव गमवावा लागणे ही नि:संशय लाजिरवाणी घटना आहे.
रॅगिंग ही सर्वसामान्य बाब असल्याची मखलाशी ट्रेनिंग सेंटरकडून दिली जात आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणा-या मुली अतिशय भावनाप्रधान आहेत. हा छळ त्यांना सोसवला नाही. ट्रेनिंग सेंटरच्या या तर्काला तपासाची दिशा मानता येणार नाही. उज्ज्वल भविष्य असलेल्या खेळाडूच्या मृत्यूला कारणीभूत असणा-यांना असेच सोडता येणार नाही.

गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या अकादमी परिसरात रॅगिंगने वेगाने हातपाय पसरले. शाळा, महाविद्यालयांतून खेळाच्या क्षेत्रातही आता या रोगाने प्रवेश केला आहे. खेळाला रॅगिंगपासून दूर ठेवावे लागेल. मात्र, असे घडताना दिसत नाही. खेळातील कारकीर्द नीटपणे दृष्टिपथात नसताना रॅगिंगमुळे भावी खेळाडूंचे भविष्य अंधकारमय होत जाते. रॅगिंगची ही कीड लवकरात लवकर घालवावी लागेल. महिला खेळाडूंची रॅगिंग होणे ही दु:खदायक घटना आहे. खेळात भाग घेण्यासाठी सर्वप्रथम त्यांना सामाजिक विरोध सोसावा लागतो. भविष्यात पुन्हा अशी कटू घटना घडली, तर आपल्या मुलीला कुणीही खेळात कारकीर्द घडवायला पाठवणार नाही. असे घडले तर मुलींना खेळाचे दरवाजेच बंद होऊन जातील. क्रीडा केंद्रात रॅगिंगच्या घटनेने व्यवस्थेचा उडालेला बोजवारा अधोरेखित होतो. खेळाचे भविष्य असणा-या नव्या पिढीसाठी उपयुक्त वातावरण तयार करावे लागेल. चांगल्या सुविधा व संरक्षण द्यावे लागेल. ही जबाबदारी प्रशासनाची आहे. आत्महत्या घडणे हे प्रशासन व्यवस्थेच्या दिवाळखोरीचेच उदाहरण आहे. केरळमध्ये घडलेला हा आत्महत्येचा प्रकार पुन्हा होऊ न देण्याचे आव्हान क्रीडामंत्री सोनोवाल आणि साईच्या श्रीनिवासन यांच्यासमोर आहे. व्यवस्थेत सुधाराची गरज आहे. साईवर अपेक्षानुरूप कामगिरी न केल्याचा ठपका ठेवला जात आहे. केंद्र सरकारही खेळाकडे जास्त लक्ष देत नसल्याचे आरोप नेहमी होत असतात. क्रीडा संघटनांना अतिशय मोजके अनुदान मिळते. माझ्या मते सरकारकडे खेळासाठी भरपूर निधी आहे. त्याचा उपयोग क्रीडा विकासासाठी करता येऊ शकतो. देशात साईची २५० केंद्रे आहेत. मात्र, बहुतांश गुणवंत खेळाडू साईबाहेरील आहेत. क्रीडा मंत्री आणि साई निर्देशकांनी आत्महत्येच्या घटनेची निष्पक्ष चौकशी होईल, असे आश्वासन दिले आहे. केंद्रात येणा-या खेळाडूंसाठी योग्य सल्लागारांची नियुक्ती केली
जाईल, असेही सांगण्यात आले आहे. या सा-या गोष्टी सत्यात उतराव्यात, अशी अपेक्षा आपण करू. हा नुसता हवेत गोळीबार न ठरावा. घटनेचे गांभीर्य ओळखून निष्पक्ष तपासाची अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...