आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडबाय ग्लास 'गो' : रंगारंग, संगीतमय कार्यक्रमाने जिंकली चाहत्यांची मने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगारंग कार्यक्रम, संगीतमय सोहळ्याने प्रेक्षकांना भुरळ घातल्यानंतर डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या आतषबाजीने विसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सांगता झाली. स्कॉटलंडमधील सर्वात मोठे शहर ग्लासगोत गेले अकरा दिवस सुरू असलेली राष्ट्रकुल स्पर्धा अतिशय थाटामाटात संपली. समारोप सोहळ्याचे आयोजन शहरातील हँपडन पार्क स्टेडियमवर करण्यात आले. कार्यक्रमात 2 हजारांपेक्षा अधिक कलाकारांनी सहभाग घेऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

समारोप सोहळ्याचे वातावरण पूर्णपणे अनौपचारिक होते आणि स्टेडियमवर उपस्थित सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांनी याचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या वेळी रॉयल एडिनबरा मिलिटरी बँडने आपल्या मनमोहक प्रस्तुतीने प्रेक्षकांना थिरकण्यास भाग पाडले.

कार्यक्रमाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली ऑस्ट्रेलियाची पॉप गायिका कायली मिनोग. तिच्या गाण्यावर मनसोक्त नाचत प्रेक्षकांनी आनंद लुटला. या वेळी ऑस्ट्रेलियाची आणखी एक पॉप गायिका जेसिका मोबायनेसुद्धा शानदार प्रस्तुती केली. हँपडेन पार्कवर उपस्थित प्रेक्षकांना एक व्हिडिओसुद्धा दाखवण्यात आला. यात पुढच्या गोल्ड कोस्टा येथे होणार्‍या राष्ट्रकुलची एक झलक दाखवण्यात आली. येथे चार वर्षांनंतर जगभरातील खेळाडू पदक जिंकण्यासाठी येतील आणि लढतील.

ग्लासगोत भारताची ‘महिला शक्ती’ भारी
भारतीय महिला खेळाडूंनी ग्लासगोत शानदार कामगिरी करताना आपल्या देशातील पुरुष खेळाडूंना बरोबरीचे आव्हान दिले. भारतीय महिलांनी 6 सुवर्ण, 13 रौप्य आणि 10 कांस्यपदकांसह एकूण 29 पदके जिंकली, तर भारतीय पुरुषांना महिलांपेक्षा फक्त 6 पदके अधिक जिंकता आली. ग्लासगोत भारताच्या 78 महिलांनी सहभाग घेतला होता.

भारताने या स्पर्धेत एकूण 15 सुवर्ण, 30 रौप्य आणि 19 कांस्यंसह एकूण 64 पदके जिंकताना पदक तालिकेत पाचवे स्थान मिळवले. या कामगिरीत पुरुष खेळाडूंनी 9 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्यपदकांसह एकूण 35 पदकांचे योगदान दिले. भारतीय पुरुष व महिला खेळाडूंत एकूण प्रदर्शनांत सहा पदकांचा फरक होता. दिल्लीतील कामगिरी बघितली तर भारताने 38 सुवर्ण, 27 रौप्य व 36 कांस्यपदकांसह एकूण 101 पदके जिंकली होती. यात पुरुष खेळाडूंनी 25 सुवर्ण, 15 रौप्य, 24 कांस्यसह 64 पदके तर महिलांनी 13 सुवर्ण, 11 रौप्य आणि 12 कांस्यसह 36 पदके जिंकली होती.

या महिलांनी पटकावली पदके
सुवर्णपदक
महिला वेटलिफ्टर संजिता खुमुकचाम, नेमबाज अपूर्वी चंदेला, राही सरनोबत, महिला मल्ल विनेश फोगाट, बबिता कुमारी, स्क्वॅशची जोडी दीपिका पल्लीकल, जोश्ना चिनप्पा.

रौप्यपदक : मीराबाई चानू, संतोष मात्सा (वेटलिफ्टिंग), सुशीला लिकमाबाम (ज्युदो), ललिता, साक्षी मलिक, गीतिका जाखड (कुस्ती), मलाईका गोयल, अयोनिका पॉल, अनिसा सय्यद, श्रेयसी सिंग (नेमबाजी), सीमा पुनिया (अ‍ॅथलेटिक्स), लेशराम सरिता देवी (बॉक्सिंग), ज्वाला गुट्टा, अश्विनी पोनप्पा (बॅडमिंटन).

कांस्यपदक : स्वाती सिंग, पूनम यादव (वेटलिफ्टिंग), कल्पना थोडम, राजविंदर कौर (ज्युदो), लज्जा गोस्वामी (नेमबाजी), नवज्योत कौर (कुस्ती), दीपिका कर्माकर (जिम्नॅस्टिक), पिंकी कुमारी जांगडा (बॉक्सिंग), पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन), सकिना खातून (पॉवरलिफ्टिंग).