आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरकाशीतील थरारक अनुभव: अक्षरश: जीव मुठीत धरून सलग 48 किमी प्रवास !!!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘वर डोंगर... खाली नदी... खचलेला रस्ता... अशात उंचावरून कोसळणारा पाऊस अशा तिहेरी संकटात आम्ही सापडलो होतो. सोबत पाठीवर 20 ते 25 किलो वजनी बॅग घेऊन सलग 48 कि.मी.चे अत्यंत धोकादायक अंतर पायी चालून कसाबसा जीव वाचवला...’ उत्तरकाशीत गिर्यारोहणासाठी गेलेल्या औरंगाबादच्या अर्चना भोसले ‘दिव्य मराठी’शी बोलत होत्या.


15, 16 जून रोजी उत्तराखंडात आलेल्या प्रलयादरम्यान अर्चना भोसले उत्तरकाशी भागातील द्रौपदी दांडा-2 या 19 हजार फूट उंच असलेल्या पर्वतावर गिर्यारोहण करीत होत्या. अचानक आलेल्या प्रलयामुळे त्यांचे पुढचे गिर्यारोहण सैन्यदलाकडून थांबवण्यात आले. 16 जून रोजी अर्चना भोसले इतर गिर्यारोहकांसमवेत बुकी येथे होत्या. बुकी ते उत्तरकाशी हे 48 किमीचे अंतर त्यांनी डोंगरद-यांतून सलग पायी चालून कापले. या 48 किमीच्या प्रवासात त्यांनी निसर्गाचा कोप किती भयंकर असतो, याचा ‘याचि डोळा, याचि देही’ थरारक अनुभव घेतला.


‘आम्ही परत येत असताना अनेक भाविक आम्हाला रस्त्यात मार्ग शोधताना सापडले. अनेक जण अडचणीत होते. माझ्या डोळ्यादेखत बरेच जण तोल जाऊन खाली कोसळले आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अनेकांना आमच्या समूहाने शक्य होईल ती मदत केली. मात्र, तेथील परिस्थितीच वेगळी होती. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होता. कोणत्या क्षणी काय होईल, याचा कोणालाच अंदाज नव्हता. आम्ही 18 जून रोजी कसेबसे उत्तरकाशी येथे पोहोचलो. तेथे दोन दिवस स्थानिक शाळेत आम्हाला थांबवण्यात आले. नंतर उत्तरकाशीहून हरिद्वार, तेथून दिल्ली आणि नंतर औरंगाबाद..असे घरी पोहोचलो. तब्बल आठ दिवस औरंगाबादेत कुटुंबाशी काहीच संपर्क नव्हता. कुटुंबातील सदस्यांशी बोलणे झाल्यानंतरच जीव भांड्यात पडला,’ असा थरारक अनुभव अर्चनाने कथन केला.


प्रशिक्षणासाठी होता दौरा
उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग (निम) या संस्थेत अ‍ॅडव्हान्स माउंटेनिअरिंग कोर्ससाठी महाराष्‍ट्राच्या 4 मुली (पुण्याची प्राजक्ता घोडे, कोल्हापूरची केतकी, मुंबईची मानसी आणि औरंगाबादहून अर्चना भोसले) गेल्या होत्या. 18 मुली आणि बेसिक कोर्सच्या 62 मुली, तसेच कोच, मार्गदर्शक अशा एकूण शंभर ते सव्वाशे जणांचा हा समूह द्रौपदी दांडा या 19 हजार फूट उंच पर्वतावर गिर्यारोहण करण्यास 19 मे रोजी निघाला होता. वातावरण बिघडल्याने त्यांना 17 हजार 672 फुटांवरूनच परतावे लागले.