आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Contractor Sport Instructors Get Extension Still May

कंत्राटी क्रीडा मार्गदर्शकांना मेपर्यंत मिळाली मुदतवाढ,शासनाने घेतला निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्य शासनाने कंत्राटी क्रीडा मार्गदर्शकांच्या कराराला येत्या मेपर्यंत नव्याने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवछत्रपती पुरस्काराच्या घोषणेनंतर क्रीडा मार्गदर्शकांचाही प्रश्न निकाली काढण्यात आला. आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील 72 मार्गदर्शकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. ‘दिव्य मराठी’ ने या 72 क्रीडा मार्गदर्शकांची व्यथा आणि कथा मांडली होती. या प्रयत्नांना अखेर यश आले.
फेब्रुवारीपासून काम सुरू : राज्याच्या विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या 72 क्रीडा मार्गदर्शकांना फेब्रुवारीपासून काम सुरू होण्याची शक्यता आहे. या कराराच्या मुदतवाढीचे पत्रक लवकरच सर्व जिल्ह्यातील क्रीडा कार्यालयांना पाठवण्यात येईल. त्यानंतर या मार्गदर्शकाचे काम सुरू होईल. त्यानंतर वेतनही लागु केले जाईल. गेले सात महिने या कंत्राटी मार्गदर्शकांचे काम थांबले होते.
10 मार्गदर्शकांचा ‘रामराम’
अनियमिततेमुळे क्रीडा मार्गदर्शकांना वेळोवेळी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. वारंवार निर्माण होणा-या समस्यांना कंटाळून अखेर दहा कंत्राटी मार्गदर्शकांनी या नौकरीला सोडले आहे.
मेनंतर पुन्हा मुदतवाढ ?
राज्य शासनाने सात महिन्यांनंतर कराराच्या मुदतवाढीला मे महिन्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर पुन्हा या मार्गदर्शकांच्या कंत्राटी करार मुदत वाढवण्याच्या प्रश्नावर तोडगा काढला जाणार आहे.
श्रेणीनुसार मार्गदर्शक
अ - 05
ब- 03
क - 64