आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत केप्रोप, किपकेटरने मारली बाजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘स्टँडर्ड चॅर्टर्ड’च्या आज पार पडलेल्या 10 व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये आफ्रिकेच्या खेळाडूंचेच वर्चस्व राहिले. विविध देशांमधील 39 हजार धावपटूंनी सहभाग नोंदवलेल्या या स्पर्धेत अव्वल गटात युगांडाच्या जॅक्सन केप्रोप याने प्रथम क्रमांक पटकावला. केनियाचा एकेझा केंबाई याने दुसरा तर युथोपियाच्या जेकब चेरशी याने तिसरा क्रमांक मिळवला.

भारतीय पुरुष गटात बिनिंग लिखॉय याने प्रथम तर आशिष सिंग आणि इलाम सिंग यांनी दुसरे व तिसरे स्थान पटकावले. महिलांच्या अव्वल मॅरेथॉन गटात केनियाची व्हेलिंटीने किपकेटर पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरली. पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये नीतेंद्र सिंग आणि सचिन पाटील यांनी बाजी मारली, तर याच विभागातील महिला गटात सुधा सिंग, रितू पाल आणि मोनिका आथरे यांनी अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. पूर्ण, अर्ध, ड्रीम, हौशी, बुजुर्ग, अपंग अशा सहा विभागात 10 वी मुंबई मॅरेथॉन पार पडली. 38 हजार 620 धावपटूंनी सहभाग नोंदवलेल्या या मॅरेथॉनमध्ये विविध देशांतील 140 अव्वल धावपटू सहभागी झाले होते. सामान्य मुंबईकरांनी आज ‘ड्रीम रन’ गटात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

25 आयएएस धावले
राज्य सरकारच्या सेवेतील 25 आयएएस अधिका-यांनी कुटुंबीयांसह ‘ड्रीम रन’मध्ये धाव घेतली. राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी तब्बल 41 कि. मी. अंतर पार केले.
17 कोटींचा निधी
यंदा नोंदणीमधून 17 कोटी रुपयांचा निधी जमा झाला. हा निधी सामाजिक स्वयंसेवी संस्थांना समाजोपयोगी कामांसाठी देण्यात येणार आहे.
रेल्वे ब्लॉक रद्द
रविवार सुटीचा दिवस असल्याने इतर वेळी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असतो. परंतु मॅरेथॉनमध्ये मुंबईकरांना सहभाग घेता यावा यासाठी रेल्वेने आजचे सर्व मेगाब्लॉक रद्द केले होते.
दिग्गजांची उपस्थिती
अभिनेता विवेक ओबेरॉय, जॉन अब्राहम, गुलशन ग्रोव्हर, ‘आरबीआय’चे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी या मॅरेथॉनमध्ये धाव घेतली.विशेष म्हणजे 101 वर्षांच्या फौजासिंग या वयोवृद्धाचा सहभाग लक्षवेधी होता.