बंगळुरू- सातव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-20 (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेसाठी बुधवारी खेळाडूंवर बोली लागणार आहे. या बोली प्रक्रियेला सकाळी 9.30 वाजेपासून प्रारंभ होईल. या प्रक्रियेची पूर्ण तयारी झाली आहे. आठ फ्रँचायझींचे मालक आणि प्रतिनिधी बंगळुरूत दाखल होऊन अव्वल खेळाडूंच्या खरेदीसाठी डावपेच आखत आहेत. यंदा प्रथमच आयपीएल-7 मध्ये खेळाडूंना भारतीय चलनात मानधन मिळणार आहे. ही बोली प्रक्रिया एकूण 274.5 कोटी रुपयांची असेल. त्यामुळे कोणत्या खेळाडूवर अधिक बोली लावली जाते, याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.
कोरी अँडरसनचा बोलबाला
यंदाच्या सत्रात आयपीएल बोली प्रक्रियेत ज्या खेळाडूविषयी अनेक कयास बांधले जात आहेत, त्यात न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनचा समावेश आहे. किवीच्या या 23 वर्षीय खेळाडूने वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वात वेगवान वनडे शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला. या विक्रमी खेळीमुळे सध्या त्याच्याच नावाचा बोलबाला आहे. त्याला यात सर्वाधिक किंमत मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
या वर्षी आयपीएलच्या सर्वच संघांना प्रत्येकी पाच खेळाडूंना टीममध्ये कायम ठेवण्याची सूट देण्यात आली, तर उर्वरित खेळाडूंचा लिलाव होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सने आपल्या टीममधील पाच खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिल्ली डेअरडेव्हिल्सने आपल्या टीममध्ये सर्वच नव्या चेहर्यांची निवड करण्याचा निर्णय जाहीर केला. रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूने तीन खेळाडूंना कायम ठेवले. पंजाब, कोलकाता आणि हैदराबादने प्रत्येकी दोन खेळाडूंचे संघातील स्थान कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षभरापासून सुमार कामगिरी करणार्या भारतीय संघाच्या खेळाडूंचीही लिलावात भाव कमी होण्याची शक्यता आहे.
9.30 वाजेपासून (सकाळी) प्रारंभ
500 पेक्षा अधिक खेळाडूंचा समावेश
274.5 कोटींची एकूण बोली रक्कम
या खेळाडूंचे स्थान कायम
1. चेन्नई सुपरकिंग्ज : महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, डॅवेन ब्रॉव्हो.
2. मुंबई इंडियन्स : एल.मलिंगा, केरॉन पोलार्ड, अंबाती रायडू, रोहित शर्मा, हरभजनसिंग.
3. राजस्थान रॉयल्स : स्टुअर्ट बिन्नी, जेस फ्युकनर, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, शेन वॉटसन.
4. रॉयल चॅलेंर्जस बंगळुरू : एल्बी डिव्हिलर्स, क्रिस गेल, विराट कोहली.
5. किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर, मनन वोहरा.
6. सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन, डेल स्टेन.
7. दिल्ली डेअरडेव्हिल्स : कोणीही नाही