ऑकलंड- विंडीजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघात प्रवेश केल्यापासूनच्या पाच कसोटी सामन्यांमध्ये मोहंमद शमी हा भारताचा सर्वोत्तम उदयोन्मुख गोलंदाज ठरत असताना दुसरीकडे भारताचे अन्य वेगवान गोलंदाज मात्र पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. तसेच त्याच्या कामगिरीच्या बळावर तो भारतीय गोलंदाजीचा कणा आणि हुकमी गोलंदाज ठरत आहे.
भारतीय संघ पहिल्या कसोटीत 40 धावांनी पराभूत झाला असला तरी त्या सामन्यातील दुसर्या डावात शमीने केलेल्या गोलंदाजीचे मोठे कौतुक होत आहे. शमीने त्याच्या गोलंदाजीच्या बळावर भारताला परतीचा मार्ग खुला करून दिला होता. मात्र, केवळ मधल्या फळीतील फलंदाजांची पडझड आणि काही निर्णय विरोधात गेल्याने भारताला सामना गमवावा लागला होता.
पहिल्या दिवसापासूनच आक्रमक
कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावरील ओलाव्याचा फायदा उठवत शमीने आखूड टप्प्यासह आक्रमक गोलंदाजी केली. कर्णधार धोनीने भारतीय गोलंदाजांनी चांगले उसळते चेंडू टाकण्याची आवश्यकता व्यक्त केल्यानुसार शमीने त्वरित ती आक्रमकता अमलात आणली होती. त्यामुळेच पीटर फुलटन आणि रुदरफोर्डला मैदानावर उसळी घेतलेल्या चेंडूंचा सामना करावा लागला होता. न्यूझीलंडने एकूण 500 धावांचा टप्पा ओलांडूनही भारताच्या चार प्रमुख गोलंदाजांपैकी तो एकमेव असा गोलंदाज होता, ज्याने 100 धावांपेक्षा कमीच धावा दिल्या . तसेच आतापर्यंतच्या पाच कसोट्यांमध्ये शमीने 21 बळी प्राप्त केले आहेत.