आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजकोट - बीसीसीआयकडून आयोजित पश्चिम विभागीय आंतरराज्य एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सोमवारी महाराष्ट्राने बलाढ्य मुंबईवर 75 धावांनी मात केली. रणजीच्या उपांत्य सामन्यात मुंबईला दणका दिल्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वनडेतही मुंबईकरांना नमते केले. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 271 धावा काढल्या. प्रत्युत्तरात मुंबईला 9 बाद 196 धावाच काढता आल्या. मधल्या फळीचा फलंदाज निखिल नाईक (75 धावा), श्रीकांत मुंढे (नाबाद 72), समद फल्लाह (3 विकेट) आणि अंकित बावणे (2 विकेट) हे महाराष्ट्राच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून एकालाही मोठी खेळी करता आली नाही. मुंबईच्या एकाही खेळाडूला अर्धशतक साजरे करता आले नाही. तळाचा फलंदाज धवल कुलकर्णीने सर्वाधिक नाबाद 39 धावा काढल्या. एस. चिटणीसने 38, अभिषेक नायरने 23 धावांचे योगदान दिले. इतरांनी खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले. अंकित बावणेने खानापूरकर आणि एस. एन. खान यांना बाद केले.
तत्पूर्वी निखील नाईक व श्रीकांत मुंढे यांच्या अर्धशतकांच्या बळावर महाराष्ट्राने 271 धावांचा टप्पा गाठला. निखिलने 98 चेंडूंत 2 षटकार आणि 4 चौकार मारले. श्रीकांत मुंढेने
नाबाद 72 धावा ठोकल्या. खडीवालेने 27, तर मोटवाणीने 47 धावांचे योगदान दिले. अंकित बावणे शून्य बाद झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.